निवडणूक प्रक्रियेची नैतिकता आणि शुचिता जपण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात एआय (AI) आधारित साधनांचा आणि डीप फेक (Deep Fake) तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी काही निर्देश जारी केले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पक्षांना लक्ष्य करणाऱ्या, खोडसाळ किंवा दिशाभूल करणाऱ्या कृत्रिम व्हिडिओंना आळा बसावा यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश सगळ्या राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना लागू असतील. 6 ऑक्टोबर 2025 रोजी बिहार विधानसभेच्या आणि 8 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या तरतुदी आता समाज माध्यमांसह इंटरनेटवर प्रसारित होणाऱ्या सर्व आशय सामग्रीला लागू आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
नक्की वाचा: Gmail ते Zoho Mail : अमित शाहांप्रमाणे तुम्हालाही ई मेल स्विच करायचा आहे? फॉलो करा या सोप्या Step
टीका करताना पातळी ओलांडू नये यासाठी निर्देश
आयोगाने स्पष्ट केले आहे की, आदर्श आचारसंहितेअंतर्गतच्या तरतुदीनुसार, इतर पक्षांवर टीका करताना, ही टीका त्यांच्या धोरणे आणि कार्यक्रम, मागील कार्यकाळ आणि कामापुरती मर्यादित असायला हवी. यासोबतच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी, इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कामांशी संबंधित नसलेल्या खाजगी जीवनातील सर्व बाबींवर टीका करणे टाळावे. इतर पक्षांवर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही पुष्टी नसलेल्या आरोपांवर आधारित तसेच विपर्यास करणाऱ्या माहितीवर आधारित टीका करणे टाळले पाहिजे.
नक्की वाचा: कानपूरमध्ये मोठा 'ब्लास्ट'; दाट वस्तीतील स्फोटाने बाजारपेठ हादरली, अपघात की कट?
AI वापरून तयार केलेल्या व्हिडीओंसाठी 'सिंथेटिक' लेबल बंधनकारक
विपर्यास करणारी माहिती अथवा समाज माध्यम व्यासपीठांवरील चुकीची माहिती प्रसारित करणारे डीप फेक आशय सामग्री तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित साधनांचा गैरवापर करू नये असा सल्लाही आयोगाने दिला आहे. याव्यतिरिक्त, सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, उमेदवार तसेच स्टार प्रचारकांनी त्यांच्या समाज माध्यम व्यासपीठांद्वारे प्रचार करण्यासाठी किंवा जाहिरातींच्या स्वरूपात, जर कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांद्वारे निर्मित / कृत्रिम स्वरुपातील आशय सामग्री सामायिक केली जाणार असल्यास, अशा आशय सामग्रीला कृत्रिम प्रज्ञा आधारित साधनांद्वारे निर्मित, डिजिटल साधनांच्याद्वारे विस्तारित (Digitally Enhanced) किंवा कृत्रिम आशय (Synthetic Content) अशी स्पष्ट स्वरुपातील नोंदीचे ठळक लेबल दिले जाईल, यासाठीच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात.निवडणुकीच्या काळात सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी समाज माध्यमांवरून सामायिक केल्या जाणाऱ्या आशय सामग्रीवर करडी नजर ठेवली जाणार आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.