गेल्या काही महिन्यांपासून Reddit हे कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या नोकरीतील समस्या आणि कामाच्या ठिकाणाबद्दलच्या चिंता व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. अनेक 'सबरेडिट्स' (Reddit वरील विशिष्ट विषयांवरील ग्रुप) तयार झाले आहेत जिथे कर्मचारी आपली दुःखे निनावीपणे मांडतात आणि समदु:खी व्यक्ती या ग्रुपशी जोडले जातात. Reddit वर एका व्यक्तीने पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्यासोबत घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला आहे. या तरुणाने म्हटले आहे की, कामाच्या ठिकाणचे वातावरण इतके वाईट बनले आहे की त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. ही पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाने म्हटलंय की कंपनीच्या सीईओने केलेल्या आरडाओऱड्यामुळे तो बेशुद्ध पडला आण त्याला रुग्णालयात दाखल करावे लागेल.
(नक्की वाचा:विमानात कबुतर उडवतात का? मराठी महिलेचा तुफान राडा; बिचाऱ्याला बेदम मारलं)
कर्मचाऱ्याने सांगितली आपबीती
Redditor ने लिहिले, "बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये मी सलग 7 महिने मानसिक छळ सहन केला. या कंपनीचा नॉन टेक्निकल सीईओ प्रत्येक लहानसहान गोष्टीत ढवळढवळ करायचा. कर्मचाऱ्यांना तो इतका ताण देत असे की कर्मचाकी कोलमडून जायचे. अवास्तव डेडलाइन देणे, त्या पूर्ण न झाल्यास कर्मचाऱ्यांवर ओरडणे हे प्रकार नित्याचे झाले होते. ही पोस्ट लिहिणाऱ्याने म्हटले आहे की, कंपनीची गुगल मीट (Google Meet) द्वारे मीटिंग सुरू होती, यावेळी सीईओने केलेल्या आरडाओरड्यामुळे मी इतका घाबरलो की मी बेशुद्ध पडलो. मला आठवतंय की तेव्हा मला श्वास घेता येत नव्हता आणि मला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या कंपनीतून राजीनामा दिल्यानंतरही तिथल्या एचआर आणि कंपनीने आपल्याला त्रास देणे सुरू ठेवले होते असंही या कर्मचाऱ्याने म्हटले आहे.
कर्मचाऱ्याने सांगितले की, तो 2024 मध्ये बेंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कामाला लागला होता. ज्युनियर डेटा सायंटिस्ट म्हणून कामाला लागलेल्या या तरुणाला इथे शिकण्याची चांगली संधी मिळेल असे वाटले होते मात्र त्याने सांगितले की इथला अनुभव हा प्रचंड वाईट होता. त्याने म्हटलं की या कंपनीच्या सीईओेने कर्मचाऱ्यांचा भयानक छळ केला. काहीही माहिती नसताना, तो फार मोठा ' डेटा सायन्स मास्टरमाइंड' असल्याचे भासवायचा आणि इतरांना ज्ञानाचे उपदेश पाजत कामासाठी दबाव टाकत राहायता. या कर्मचाऱ्याने पुढे म्हटलंय की हा सीईओ मनाला येईल तेव्हा प्रोजेक्टच्या गरजा बदलत असे आणि त्यासाठी वाट्टेल तशा डेडलाइन तयार करत असे.
या कर्मचाऱ्याने पुढे म्हटलंय की, हा माणूस माझ्याकडून रोजच्या रोज माझ्या कामाच्या प्रत्येक लहानसहान तपशील जाणून घ्यायचा. त्याला गोष्टी कळत नसताना आणि मी सांगत असलेली गोष्ट बरोबर असतानाही तो काहीतरी मुद्दे काढून माझ्यावर भडकायचा आणि ओरडायला सुरुवात करायचा.
माझा स्वभाव शांत असल्याचा फायदा सीईओने घेत रिपोर्टींग मॅनेजरला बाजूला सारत थेट त्याच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्याने सांगितलं की त्याला दिवसाला 12ते 14 तास काम करण्यासाठी भाग पाडले जात होते. विकएंडलाही त्याला काम करण्याची जबरदस्ती केली जात होती. या सगळ्या काळात आजारी पडल्याने मी फक्त 2 वेळा रजा घेतली होती, मात्र त्याबद्दल या सीईओला काहीही वाटले नाही असे या कर्मचाऱ्याने म्हटले आहे. तो सतत माझ्या कामात चुका काढण्याचा प्रयत्न करायचा, दोष द्यायचा आणि आरडाओरडा करत राहायचा असं या कर्मचाऱ्याने म्हटले आहे. या सगळ्याला कंटाळून या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला तेव्हादेखील हा सीईओ त्याच्यावर भडकला होता, त्याने थयथयाट करण्यास सुरुवात केली ज्यामुळे जबरदस्त घाबरलो आणि बसल्या जागीच बेशुद्ध पडलो असे या कर्मचार्याने सांगितले. सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी या सीईओवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.