केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक फ्लेक्स इंझर कार लाँच केली. ही कार 100 टक्के इथेनॉलवर धावू शकते. काही वर्षांपूर्वी वाहनांच्या इंधनात पाच-दहा टक्के इथेनॉलच्या मिश्रणाचे धोरण सरकारने आखले. देशात सध्या ई-20 लागू आहे, म्हणजेच 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल. आता संपूर्ण इथेनॉलवरच वाहने चालविण्याचे धोरण येत आहे. ब्राझीलमध्ये 90 टक्के वाहने इथेनॉलवरच चालतात. सध्या देशात सुमारे पावणे पाचशे कोटी लिटर इतक्या इथेनॉलची निर्मिती होते.
इथेनॉल म्हणजे काय?
इथेनॉल हे मका, ऊस आणि गहू यांसारख्या वनस्पतींच्या साहित्यापासून बनवलेले अल्कोहोल असते. म्हणजेच इथेनॉल हे सतत तयार होणाऱ्या संसाधनांमधून तयार केली जाऊ शकते. इथेनॉल कुठेही प्राप्त होत नाही तर ते मानवनिर्मित आहे. ज्याचा वापर आपण कोणत्याही गाडीमध्ये त्यात पेट्रोलमिश्रित करून एक इंधन म्हणून देखील वापरू शकतो.
ब्राझील या देशात 1932 मध्ये इथेनॉलचा वापर सर्वात आधी करण्यात आला होता. त्यामुळे आज ब्राझील या देशात पेट्रोलमध्ये 23 टक्के इथेनॉल मिसळले जाते. भारत सरकारही यासाठी प्रयत्नशील आहे. इंधनासाठी पेट्रोलवर पूर्णत: अवलंबवून न राहता इथेनॉलची निर्मिती वाढवावी.
इथेनॉलमुळे प्रदूषणावर नियंत्रण राखता येईल?
इथेनॉल एक इको-फ्रेंडली इंधन म्हणून ओळखले जाते. इथेनॉल पिकांपासून तयार करण्यात येते. जे पेट्रोलपेक्षाही जास्त क्लिनर बर्निंग आहे. इथेनॉल कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स सारख्या प्रदूषखांचे कमी उत्सर्जन करते. हे हवेची गुणवत्ता सुधारण्यास आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यात मदत करू शकते.
इथेनॉल वापरण्यात येणारी आव्हाने
- इथेनॉल निर्मितीचा खर्च पेट्रोलच्या उत्पादनाच्या खर्चापेक्षा जास्त
- इथेनॉल पाणी शोषू शकतं, ज्यामुळे इंजिनाला गंज लागण्याची भीती
- इथेनॉलमध्ये गॅसोलीनपेक्षा कमी उर्जा सामग्री असल्याने चांगले गॅस मायलेज मिळणं कठीण
मात्र वरील काही आव्हाने असली तरी इथेनॉलच्या वापरावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. यामागील कारण म्हणजे इथेनॉल हे एक आश्वासक नवीन इंधन आहे. जे परकीय तेलावरील आपलं अवलंबित्व कमी करू शकेल आणि हवेच्या गुणवत्ततेही सुधारणा होऊ शकेल.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर...
भारतात इथेनॉल निर्मितीमुळे शेतकरी वर्गाला मोठा फायदा होऊ शकतो. कारण इथेनॉलची निर्मिती ऊस, मका, गहू, धान्य अशा उत्पादनांपासून केली जात असते. त्यामुळे हे पीक घेणाऱ्या शेतकरी वर्गाला यासाठी अधिक रक्कम मिळू शकेल. इथेनॉलचा वापर केल्याने नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जनदेखील कमी होत असते. साखर कारखानदारांना एक नवीन उत्पन्नाचे स्त्रोत तसेच माध्यमा प्राप्त होईल.
आक्षेप काय?
ऊसाबरोबरच तांदूळ, मका, ज्वारी-बाजरी अशा धान्यांपासून इथेनॉल निर्मितीला चालना मिळाल्यास विविध धान्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा वापर वाढल्यात भविष्यात देशातील अन्नसुरक्षेलाही धक्का लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जमीन व पाणी मौल्यवान असल्याने त्याचा वापर योग्य ठिकाणी होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनावर परिणाम होत असल्याच्या तक्रारीही आहेत.