रामराजे शिंदे, प्रतिनिधी
CBSE Result : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून काही ना काही वाद समोर येत आहे. आधी ऑन-स्क्रीन मार्किंगमधील चुका, त्यानंतर अस्पष्ट उत्तरपत्रिकांच्या तक्रारी आणि आता, उत्तरपत्रिका न मिळाल्याचे एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. वेदांत नावाच्या विद्यार्थ्याला दुसऱ्याच विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाठवण्यात आली होती. अखेर सीबीएसईने चूक मान्य केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वेदांत नावाचा एक विद्यार्थी त्याला मिळालेल्या गुणांवर असमाधानी होता. त्याने नियमानुसार पुनर्तपासणीसाठी अर्ज केला. वेदांतचा भाऊ, सिद्धांत श्रीवास्तव याने सांगितले की, त्याने १९ मे रोजी उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता आणि ती त्याला २३ मे रोजी ईमेलद्वारे मिळाली. मात्र जेव्हा ईमेलद्वारे आलेली कॉपी उघडली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण उत्तरपत्रिका वेदांतची नव्हती. बोर्डाने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कॉपीवर वेदांतचा नाव दिलं होतं. वेदांतच्या निमित्ताने गुणांच्या विसंगतीचे एक मोठं प्रकरण समोर आलं आहे.
सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये या मुद्द्याला प्रसिद्धी मिळाल्यानंतर, सीबीएसईला अखेर आपली चूक मान्य करावी लागली. मंडळाने तत्काळ कारवाई करत वेदांतला त्याची भौतिकशास्त्राची मूळ उत्तरपत्रिका ईमेलद्वारे पाठवली. त्या ईमेलमध्ये असेही नमूद केले होते की, नवीन गुणांच्या आधारे त्याचा निकाल लवकरच अद्ययावत केला जाईल.
सोशल मीडियावर गदारोळ
या घोर निष्काळजीपणानंतर, वेदांतने ट्विटरवर आपलं मतं व्यक्त केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मदत मिळण्याऐवजी, त्याला सुरुवातीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर वेदांतच्या भावाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले. कुटुंबानेही तात्काळ CBSE ला ईमेल पाठवून आणि हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून आपला आक्षेप नोंदवला.