रामराजे शिंदे, नवी दिल्ली
NEET परीक्षेचा निकाल केंद्रनिहाय जाहीर केल्यानंतरही संभ्रम कायम आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर NTA ने नीट परीक्षेचा निकाल वेबसाईटवर अपलोड केला आहे. मात्र NTA ने अपलोड केलेल्या निकालातून गडबड कुठल्या केंद्रात झाली हे स्पष्ट होत नाही, असं म्हणत याचिकाकर्त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि NTA संचालकांना पत्र लिहिलं आहे.
NTA ने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी केली नाही अशी तक्रार याचिकार्त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की NEET चा निकाल NTA च्या वेबसाईटवर परीक्षा केंद्रनिहाय प्रकाशित करावा. निकालातून कोणत्या केंद्रावर काही गडबड झाली आहे की नाही याचा अंदाज येईल, अस कोर्टाने म्हटलं होतं.
नीट परीक्षार्थींची ओळख सार्वजनिक होऊ नये म्हणून त्यांची नावे लपवावीत, असं देखील कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं. NTA ने जाहीर केलेल्या निकालात नाव आणि रोल नंबर दोन्ही लपवण्यात आले आहेत. रोल नंबरच्या जागी दिलेले अनुक्रमांक देखील रोल नंबरच्या क्रमाने दिलेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही केंद्राची माहिती स्पष्ट होत नाही, असं याचिकाकर्त्यांचं मत आहे. म्हणून त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि एनटीएच्या संचालकांना पत्र लिहिलं आहे.
काय आहे प्रकरण?
NEET-UG 2024 ची परीक्षा 5 मे रोजी पार पडली. परीक्षेत अनियमितता आणि पेपरफुटीचा आरोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरु केली. NEET-UG परीक्षेत जास्त गुण दिल्याचे NTA वर आरोप झाले आहेत. त्यामुळे यंदा विक्रमी 67 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. गेल्या वर्षी अवघे दोन विद्यार्थी अव्वल आले होते. अनेक विद्यार्थ्यांचे गुण जाणूनबुजून वाढवले किंवा कमी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे 6 केंद्रांवर परीक्षा घेण्यास उशीर झाला होता. वेळेचा अपव्यय भरून काढण्यासाठी, अशा केंद्रांमधील किमान 1500 विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणही देण्यात आले, ज्यांची चौकशी सुरू आहे.
ग्रेस मार्क्स कुटे दिले गेले?
मेघालय, हरियाणा, छत्तीसगड, सुरत आणि चंदीगडमधील किमान 6 परीक्षा केंद्रांवर परीक्षेला उशीर झाला. परीक्षेला कमी वेळ मिळाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने तयार केलेल्या सूत्राच्या आधारे या केंद्रांमधील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले.