तेलुगू देसमचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नायडू विजयवाडाच्या उपनगरीय भागातील गन्नवरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये सकाळी 11.27 मिनिटांनी शपथ घेतील. मंगळवारी तेलुगू देसमच्या आमदारांनी आणि एनडीए मित्रपक्षांनी नायडूंची आपला नेता म्हणून निवड केली आहे. या शपथविधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नेते आणि सेलिब्रिटीदेखील सामील होतील. पीएम मोदी आधी आंध्रप्रदेशात जातील, त्यानंतर ओडिशाला जाणार आहेत. ओडिशात पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झालं असून येथील शपथविधीला पीएम उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील विजयवाडामध्ये आंध्रप्रदेशातील मनोनित मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंच्या शपथविधी सोहळ्यात सामील होतील.
विधानसभा निवडणुकीत किती जागांवर विजय
विधानसभा निवडणुकीत नायडूंच्या नेतृत्वात एनडीए सरकारने 175 पैकी 164 जागांवर विजय मिळवला.
नक्की वाचा - केंद्र सरकारमधील कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्रींमध्ये काय असतो फरक? वाचा संपूर्ण माहिती
आंध्रप्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळं झाल्यानंतर अजूनही येथे राजधानीवरुन वाद सुरू आहे. यामध्ये तीन राजधानींचा उल्लेख केला जातो. मात्र आता तेलुगू देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू यांनी केवळ एक राजधानी ठेवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी सांगितल्यानुसार, अमरावती ही एकमेव राजधानी असेल.
कसं असेल चंद्राबाबूंचं मंत्रीमंडळ?
चंद्राबाबू हे मुख्यमंत्री तर पवन कल्याण हा उपमुख्यमंत्री असणार आहेत. पवन कल्याणकडे उपमुख्यमंत्रीपदासह महत्वाची खाती दिली जाणार असल्याची माहिती आहे. पवन कल्याणकडे 3 कॅबिनेट मंत्रिपदं तर भाजपला दोन कॅबिनेटची शक्यता आहे. टीडीपीला 20 मंत्रीपदाची शक्यता, जास्तीत जास्त मागासवर्गीय नेत्यांना संधीची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडूंचा मुलगा नारा लोकेशही मंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.