- छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून सुटकेच्या वेळी पेटाऱ्यात बसून निसटकले नाहीत?
- महाराज आग्र्याहून निघाल्यानंतर राजगडावर कसे पोहोचले?
- आग्रा मोहीमेमध्ये शिवाजी महाराजांची मदत कोणी केली?
- राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Chhatrapati Shivaji Maharaj Agra Escape Mystery: छत्रपती शिवाजी महाराज मथुरेला गेलेच नव्हते तसेच आग्रा मोहीमेदरम्यान महाराज पेटाऱ्यातून निसटले नव्हते, असा दावा प्रसिद्ध कादंबरीकार आणि इतिहासकार विश्वास पाटील यांनी केलाय. आपल्या 'अस्मान भरारी' या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून या गोष्टींचा दावा त्यांनी केलाय. विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक घडामोडींबाबत केलेल्या संशोधनाबाबत NDTV मराठीने त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचित केलीय, त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया...
शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले, पुढील प्रवास कसा होता?
इतिहासकार विश्वास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज ज्या जुन्या मार्गाने आग्र्याला गेले, तेथून मी दोनदा आग्र्याला जाऊन आलो. मागील दीड-दोन वर्षात येतानाच्या मार्गाने मी तीन वेळा जाऊन आलोय. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले आणि ते प्रयागला आले. प्रयागवरून बघेलखंड, बुंदलेखंड करत यमुनेचे जे उगमस्थान अमरकंटक तीर्थक्षेत्री ते पोहोचले होते. याचं कारण मुख्य असं की या आग्रा मोहीमेचे जे वैशिष्ट्य होते ते म्हणजे स्वामी परमानंद. स्वामी परमानंद एक सक्रिय स्वामी होते. त्यांच्याकडे स्वतःचे पाच हजार घोडे, 20-25 हत्ती होते. स्वामी परमानंदांचे जे नेटवर्किंग होतं, ते सर्व प्रकारच्या साधूंचे होते. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटताना त्यांच्यासाठी स्वामी परमानंदांनी या साधूंची मदत घेतली होती. यानंतर औरंगजेबाने त्यांना कैद केलं आणि बरीच मारझोडही केली होती.
(नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे)
शंभूराजे आजारी पडले, मग....
इतिहासकार विश्वास पाटील यांच्या मते, शिवाजी महाराज मथुरेला गेले नव्हते, प्रयागजवळ ही सर्व मंडळी भेटली. शंभूराजेही मथुरेला गेले नव्हते. उलट बाजूने जाऊन परकियांच्या हाती सापडण्याचे काहीच कारण नव्हते. शंभूराजे कमालीचे आजारी पडले होते, त्यावेळेस त्यांना त्रिमल बंधूंच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी शंभूराजे मथुरेला गेले. शिवाजी महाराज महाराष्ट्रात परतले होते.
औरंगजेबाने 12 मे ते 17 ऑगस्टदरम्यान शिवाजी महाराज यांना ठार मारण्याचे पाच वेळा आदेश दिले होते. महाराज पेटाऱ्यातून गेलेच नाहीत. मुघल सरदार रामसिंह यांनी महाराजांना मदत केली, मानुची हा इटालियन प्रवासी होते, हा प्रत्यक्षदर्शी होता. मुघलांच्या तोफदलाचा प्रवासी होता. त्याने म्हटले होते की रामसिंह याने घोड्यांची व्यवस्था केली होती,अशी माहिती विश्वास पाटील यांनी सांगितली.
"महाराज निसटले त्याची औरंगजेबाने प्रत्यक्ष चाचणी करून पाहिली"
विश्वास पाटील यांनी पुढे असंही सांगितलं की, मला एक कथा ऐकायला मिळाली की चिडिया खाना नावाचं प्राणी संग्रहालय होतं. जहांगीरच्या काळात दोन-चार हजार हरणं तिथे होती. औरंगजेबाला शंका आली त्यावेळेस त्याने मोठ्या पेटाऱ्यात मोठं हरीण आणि छोट्या पेटाऱ्यात छोटं हरीण ठेवलं. ज्यानुसार शिवाजी महाराजांनी प्रवास केला असं सांगण्यात आलं होतं, तितकाच प्रवास हरणांच्या पेटऱ्यांचाही करण्यात आला, अशा पद्धतीने औरंगजेबने चाचणी केली. यामध्ये मोठं हरीण मृत्यूमुखी पडले तर छोटं बेशुद्ध झालं होतं.
औरंगजेबाने विचारलेला प्रश्न असा होता की, शिवाजी महाराज आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालून पेटाऱ्यातून नेण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. संभाजी महाराजांना पळवायचे असते तर ज्या दिवशी शिवाजी महाराज आग्र्याहून निघाले त्याच दिवशी नेता आले असते. कारण छत्रपती संभाजी महाराजांना अटक केलेली नव्हती, असेही विश्वास पाटील म्हणाले.
विश्वास पाटील यांच्या मते, औरंगजेबाचे म्हणणे असे होते की मला महाराष्ट्रातील माणसंच नव्हे तर भूतं-खेतंही परिचयाची आहेत. शिवाजी महाजारांनी तुम्हाला मूर्ख बनवलं. त्यांनी पेटारे दाखवले आणि तुम्ही पेटारेच पाहत राहिलात, शिवाजी महाराज दुसऱ्या बाजूने पसार झाले. म्हणजे त्यांनी एक प्रकारे भानामतीच केली.
सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी कशी लढवली शक्कल?शिवाजी महाराज यांचा वर्ण गोरा होता. त्याचा वापर करून त्यांनी आपण अरबी किंवा पारशी घोडेस्वार, घोड्याचा खरारा करणारा सेवक असल्याचे भासवले आणि सर्वांसमोर ते निसटले. महलाभोवती दोन हजार सैनिकांचा पहारा असताना शिवाजी महाराज गेले कसे? हेच औरंगजेबाचे दु:ख होतं. रामसिंह आणि त्याच्या लोकांनी फंदफितुरी केल्याने शिवाजी महाराज निसटू शकले, असा निष्कर्ष औरंगजेबाने काढला.