छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीनंतर सुरक्षा दलाने केलेल्या शोध मोहितेम मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. दंतेवाडा आणि बीजापूर सीमावर्ती भागात ही चकमक झाली.
पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने एक संयुक्त मोहीम राबवत परिसराला घेराव घातला. सकाळी 10.30 च्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी पथकाने आज सकाळी शोध मोहीम सुरु केली होती. त्यानंतर काही वेळातच दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु झाला. दोन्ही बाजूने सकाळपासून थांबून थांबून गोळाबार सुरु होता. सुरक्षा दलाने केलेल्या या गोळीबारात 10 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. 28 ऑगस्ट रोजी कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने कारवाई केली होती. या नक्षलविरोधी कारवाई देखील अनेक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली होती.
बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी पीटीआय भाषा सांगितलं की, "दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्याच्या सीमेवर जंगलात नक्षलावादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर डिस्ट्रिक रिजर्व्ह गार्ड (डीआरजी) आणि केंद्रीय रिजर्व्ह पोलीस बल (सीआरपीएफ)ने संयुक्त कारवाई सुरु केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. बराच वेळ दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. अखेर गोळीबार थांबल्यांतर करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये 10 नक्षलवादी ठार झाल्याचं समोर आलं. दरम्यान मोठ्या प्रमाण हत्यारं देखील जप्त करण्यात आली आहेत. "