CJP Kya Bolti Public campaign : नीट परीक्षेतील गैरव्यवहारांच्या विरोधात आंदोलन केल्यानं चर्चेत असलेली कॉकरोच जनता पार्टी (CJP) येत्या सप्टेंबर महिन्यापासून देशभरात 'क्या बोलती पब्लिक' ही नवी मोठी मोहीम सुरू करणार आहे. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या आंदोलनाची अधिकृत घोषणा केली. या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी देशातील 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा हा सर्वात मुख्य मुद्दा असणार आहे.
काय आहे'क्या बोलती पब्लिक' मोहीम?
पक्षाच्या विचारधारेबद्दल बोलताना अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की, कॉकरोच जनता पार्टीची विचारधारा ही पूर्णपणे भारतीय संविधानावर आधारित आहे. सप्टेंबरपासून सुरू होणारी 'क्या बोलती पब्लिक' ही मोहीम म्हणजे एकप्रकारे संपूर्ण देशाचा दौरा असणार आहे. आज देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने आणि नेत्यांनी लोकांचे म्हणणे ऐकले नाही, तर जनतेला थेट रस्त्यावर उतरावेच लागेल, असे दीपके यांनी सांगितले.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: 'सत्ता बदलत राहते, पण...' आईला 'गुंगी गुडीया' म्हटल्यानंतर जय पवारांची 'ती' पोस्ट चर्चेत )
कोणत्या मुद्द्यावर लढा?
संपूर्ण देशभरात चालणाऱ्या या मोहिमेत सीजेपी मुख्यत्वे 5 प्रश्नांवर लढा देणार आहे. यातील पहिला आणि सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा म्हणजे शिक्षण व्यवस्था होय. देशातील सध्याच्या परिस्थितीला शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असून यात आमूलाग्र बदल घडवणे हे पक्षाचे मुख्य ध्येय आहे.
याशिवाय देशातील न्याय व्यवस्था अधिक मजबूत आणि पारदर्शक बनवणे हा दुसरा मुद्दा असेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशातील बेरोजगारी आहे. सध्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून तब्बल 60 टक्के तरुणांकडे नोकऱ्या नाहीत. उच्चशिक्षित तरुणांनाही काम मिळत नसल्याने आणि असलेल्या कामात कमी वेतन मिळत असल्याने सीजेपी यावर आवाज उठवणार आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा झटका; राष्ट्रवादीच्या घटनेतील बदलांवर मागितला तातडीने खुलासा )
CJP चे भवितव्य काय?
पक्षाच्या भवितव्याबद्दल सांगताना दीपके म्हणाले की, सीजेपी पारंपरिक राजकारणात पडणार नाही, कारण कोणतीही एक व्यक्ती एकटीने सर्व समस्या सोडवू शकत नाही. पक्षाचे अंतिम ध्येय राजकारण नसून समाजसेवा आणि देशात सकारात्मक बदल घडवणे हेच आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिक आणि समर्थकांना एकत्र आणून देश सुधारण्याचे काम केले जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world