देशाची राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेले 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि अभिजीत दीपके यांच्या समर्थकांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहे. सोमवारी जंतर-मंतर ते संसदेपर्यंत काढण्यात आलेल्या विरोध मोर्च्यादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये तुफान चकमक झाली होती. या हिंसक घटनेनंतरही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून, मंगळवारी सकाळी मुसळधार पावसातही आंदोलकांनी पुन्हा एकदा जंतर-मंतरवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीवर सीजेपी अडून बसली असून, मागणी पूर्ण होईपर्यंत जंतर-मंतर सोडणार नाही आणि मागे हटणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
संसदेच्या दारापर्यंत पोहोचली गर्दी
गेल्या 14 वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची गर्दी संसदेच्या अगदी दारापर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले आहे. यापूर्वी 2012 मधील निर्भया प्रकरणाच्या वेळी संसदेच्या परिसरात अशाच प्रकारे तीव्र आणि व्यापक आंदोलन पाहायला मिळाले होते.
आंदोलकांनी मंगळवारीही पुन्हा संसदेवर मार्च काढण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमांवर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि संशयित व्यक्तीची कडक तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.
(नक्की वाचा- Kolhapur News: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा घोटाळा; तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा)
कनॉट प्लेस आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल
सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान कनॉट प्लेसच्या आउटर सर्कलमध्ये रीगल सिनेमाजवळ काही उपद्रवूंनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली होती तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली होती. या हिंसाचाराची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांनी कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता पोलिसांनी जंतर-मंतर रिकामे केले होते, मात्र आंदोलक रात्री 11 वाजेपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी जमा झाले.
सरकारसोबत चर्चेस तयार, पण राजीनाम्याची अट कायम
सोमवारी सीजेपीचे प्रतिनिधी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्यात एक बैठक पार पडली. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आंदोलकांच्या कोणत्याही मागणीवर ठोस आश्वासन दिलेले नाही. जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांना धरणे आंदोलन मागे घेऊन सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले की, "जंतर-मंतरवर आमचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील. सरकारसोबत चर्चेचे दरवाजे उघडे आहेत, जर सरकारने आम्हाला निमंत्रित केले तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही आमची मुख्य अट आहे."