Coldplay 2025 Concert Tickets: Coldplay या परदेशी गायकांच्या गाण्याच्या कार्यक्रमाची तिकिटे विक्री सुरू होताच काही मिनिटांत विकली गेली. 18 जानेवारी 2025 रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटांचे दर अडीच हजार रुपयांपासून सुरू होत आहेत. कॉन्सर्टचे सर्वाधिक महागडे तिकीट 35 हजार रुपये इतके आहेत. हे तिकीट लाऊंज स्वरूपातील आहे आणि या तिकिटाच्या दरामध्ये खाणे-पिणे, कार्यक्रम पाहण्यासाठी विशेष कक्षात आसन व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये विशेष प्रवेशद्वारे यासारख्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रविवारी (22 सप्टेंबर) दुपारी या कार्यक्रमाच्या तिकिटांच्या बुकिंगला सुरुवात झाली. सुरुवात होताच काही मिनिटांमध्ये ही तिकीटे विकली गेली. यामुळे तिकिटांसाठी धडपड करणारी मंडळी सोशल मीडियावर आगपाखड करत आहेत. तिकिटे विकली गेली तरी एक भलीमोठी ऑनलाइन रांग बुकिंग साइटवर दाखवली जात होती. रेल्वेच्या तिकिटासाठीची जशी वेटिंग लिस्ट असते, तशीच वेटिंग लिस्ट इथेही पाहायला मिळाली. मात्र वेटिंगची रांग इतकी लांब होती की अनेकांचे डोळे फिरले. एक वेळ अशी आली की या ऑनलाइन रांगेत 10 लाखांहून अधिक लोक तिकिटासाठी ताटकळत होते.
(नक्की वाचा: "भारत जळणारा नाही, तर सूर्याप्रमाणे प्रकाश देणार", PM मोदींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 ठळक मुद्दे)
या कार्यक्रमासाठीच्या तिकिटाचे दर किती होते ते आपण पाहुया
- 2 हजार 500 रुपये
- 3 हजार 500 रुपये
- 4 हजार रुपये
- 4 हजार 500 रुपये
- 6 हजार 450 रुपये
- 9 हजार रुपये
- 12 हजार रुपये
- 12 हजार 500 रुपये
- 35 हजार रुपये
(नक्की वाचा : लेबनानमधील पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन ? वायनाडमधील तरुणाचा शोध सुरु)
'कोल्ड प्ले'च्या आयोजकांना गरम रट्टे
तिकिटे न मिळाल्याने अनेकांनी आपला राग सोशल मीडियावरून व्यक्त केला, काहींनी गंभीर पद्धतीने तर काहींनी गंमतीशीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. यातील काही निवडक पोस्ट आपण पाहुया...
तिकिटांच्या नावाखाली गंडा
'ऑनलाइन तिकिटे विकत घेऊन ती ब्लॅकने चढ्या दराने विकण्याचा काहींनी प्रयत्न सुरू केला आहे, असे BookMyShowने म्हटले आहे. ही तिकिटे काही ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत, मात्र तिकिटांचा काळाबाजार हा बेकायदेशीर असून कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही ही तिकिटे विकत घेऊ नका कारण तुम्ही खोटी तिकिटे विकत घेत आहात' असे BookMyShowने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आहे.
3 लाख रुपयांना विकली जात आहेत तिकिटे
सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर विजय नारायण नावाच्या व्यक्तीने पोस्ट करत म्हटले की, बुकमायशोने तिकीट विक्री सुरू करताच तिकिटांची पुन:विक्री करणाऱ्या Viagogoने पण तिकीट विक्रीला सुरुवात केली. फरक इतकाच होता की वियागोगोवर तिकिटाचे दर हे 38 हजार रुपयांपासून 3 लाख रुपयांपर्यंत होते.