लेबनानमध्ये मंगळवारी (17 सप्टेंबर) रोजी झालेल्या पेजर स्फोटाच्या सुरु असलेल्या तपासामध्ये केरळमधील एका तरुणाचं नाव समोर आलं आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून हजारो जणं जखमी झाले आहेत. केरळमधील वायनाडचा असलेला पण आता नॉर्वेमध्ये स्थायिक झालेल्या रिनसन जोस या तरुणाचं नाव या प्रकरणात समोर आलं आहे. या स्फोटानंतर तो आणि त्याची पत्नी गायब असून त्यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लेबनानमध्ये झालेल्या पेजर स्फोटाला हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलला जबाबदार धरलंय. इस्रायलनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. पण, इस्रायल या गुप्तचर संघटनेनं पेजरमध्ये कसे स्फोटकं ठेवली याचा शोध सध्या जगभर घेतला जातोय. हिजबुल्लाहला ज्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून पेजर पुरवण्यात आले त्यामध्ये मुळचा वायनडाचा पण आता नॉर्वेचा नागरिक असलेल्या रिनसन जोसचं नाव समोर आलं आहे.
या प्रकरणातील प्राथमिक तपासानुसार मोसादकडून कथितपणे तीन ग्रॅम स्फोटकं लपवण्यासाठी मॉडिफाइड केलेले पेजरची निर्मिती तैवानची कंपनी गोल्ड ओपोलोनं केली होती. त्यानंतर कंपनीनं याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानुसार स्फोटकांचा समावेश असलेलं पेजर मॉडल AR-924 हंगेरीच्या बुडापेस्टमधील BAC कंसल्टिंग KFT या कंपनीनं तयार केलं होतं. या कंपनीला गोल्डो ओपोलोनं त्यांचा ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी दिली होती.
( नक्की वाचा : खोटी कंपनी बनवली आणि 'पप्पू' पेजरला बॉम्ब बनवण्यासाठी इस्रायलनं वापरलं असं डोकं की...)
रिनसनचा संबंध काय?
हंगेरीतील 'टेलेक्स' या वृत्तमाध्यमानं दिलेल्या माहितीनुसार पेजर स्फोटाच्या प्रकरणात केरळच्या रिनसन जोसच्या संबंधांची चौकशी सुरु आहे. या पेजर सौद्याच्या प्रकरणात बुल्गारियाच्या नॉर्टा ग्लोबल लिमिटेड या कंपनीचा सहभाग होता. या कंपनीची स्थापना रिनसन जोसनं केली होती. रिनसन जोस हा मुळचा केरळमधील वायनाडचा रहिवाशी आहे.
बुल्गारियाची सुरक्षा यंत्रणा DANS कडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. लेबनानमधील स्फोटात वापरलेले गेलेले पेजेर बुल्गेरियामध्ये आयात, निर्यात किंवा निर्माण केलेले नव्हते, असं DANS नं स्पष्ट केलंय.
कोण आहे रिनसन जोस?
न्यूज एजन्सी आयएनएसनं दिलेल्या माहितीनुसार, जोस काही वर्षांपूर्वी उच्च शिक्षण घेण्यासाठी नॉर्वेला गेला होता. त्यानं काही काळ लंडनमध्येही काम केलंय. एएफपीच्या रिपोर्टनुसार तो नॉर्वेजियन प्रेस समुह डीएन मीडियाशी संबंधित आहे. जोसनं त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्येच ही माहिती दिली आहे. त्यानं डीएन मीडियाच्या डिजिटल कस्टमर सपोर्टमध्ये जवळपास पाच वर्ष काम केलंय. जोस मंगळवारी कामासाठी विदेशात गेला. त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही, अशी माहिती डीएन मीडियानं दिली आहे.
जोसचे नातेवाईक थंकाचेन यांनी वृत्तसंस्थांना शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार जोस त्याच्या पत्नीसोबत ओस्लोमध्ये राहतो. त्याचा जुळा भाऊ लंडनमध्ये असतो. 'आम्ही रोज फोनवर बोलतो. पण गेल्या तीन दिवसांपासून आमचा जोसशी काहीही संपर्क नाही. तो एक सरळमार्गी व्यक्ती आहे. आमच्या त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो कोणतंही चुकीचं काम करप शकत नाही. तो कदाचित या स्फोटात अडकला असेल. त्याच्या पत्नीशीही कोणता संपर्क होत नाही, ' असंही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world