Prithviraj Chavan Modi Trump Statement : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हेनेझुएलाप्रमाणे भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करतील का? असा धक्कादायक प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भारतासारख्या अण्वस्त्रधारी देशाच्या पंतप्रधानांबाबत अशा प्रकारचे विधान करणे अत्यंत बालिशपणाचे असल्याचे सांगत अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये रात्रीच्या वेळी लष्करी कारवाई करून तिथल्या अध्यक्षांना ताब्यात घेतले होते. याच घटनेचा संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताबाबत साशंकता व्यक्त केली. ट्रम्प भारताच्या पंतप्रधानांचे अपहरण करतील का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील पंतप्रधान मोदींवर ट्रम्प यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यापाठोपाठ चव्हाण यांनी हे वक्तव्य केले आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
माजी पोलीस महासंचालकांकडून तीव्र शब्दांत निषेध
जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्या तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे विधान संपूर्ण देशाचा अपमान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एखादी गोष्ट बोलण्यापूर्वी विचार करायला हवा, अशा शब्दांत त्यांनी चव्हाण यांना सुनावले.
तसेच, नरेंद्र मोदींबाबत अशी विचारसरणी ठेवणे हीच काँग्रेसची खरी विचारधारा आता उघड होत आहे का, असा सवालही वैद यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर देखील चव्हाण यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून नेटकऱ्यांनी त्यांना अशिक्षित आणि मूर्ख अशा शब्दांत संबोधले आहे.
( नक्की वाचा : खळबळजनक! छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते; भाजपच्या बड्या मंत्र्याचे सुरतमध्ये वक्तव्य )
व्यापार युद्धावरून काँग्रेसची मोदींवर टीका
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के शुल्कावरून (टॅरिफ) सरकारला धारेवर धरले. एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क लावल्यानंतर अमेरिकेसोबत व्यापार करणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले. भारताची निर्यात रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले असून यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचा नफा संपणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताला आता पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील, असेही ते म्हणाले. याच व्यापार युद्धाच्या चर्चेदरम्यान त्यांनी व्हेनेझुएलाचा संदर्भ देऊन वाद ओढवून घेतला.
मल्लिकार्जुन खर्गे यांचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांच्या आधी मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील ट्रम्प यांच्या एका ऑडिओ क्लिपचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याबाबत ट्रम्प यांनी मोदींवर दबाव आणल्याचा दावा खर्गे यांनी केला.
मोदी मला आनंदी ठेवू इच्छितात, असे ट्रम्प त्या क्लिपमध्ये म्हणाल्याचे खर्गे यांनी सांगितले. यावरून खर्गे यांनी 'मिस्टर इंडिया' चित्रपटातील मोगॅम्बो खुश झाला हा डायलॉग मारत मोदींची खिल्ली उडवली. मोदी ट्रम्प यांच्या नियंत्रणात असल्याचा आरोप खर्गे यांनी यावेळी केला.
( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )
निर्यात दरांमध्ये वाढ आणि व्यापारी स्थिती
एकीकडे काँग्रेसकडून मोदी सरकारवर व्यापार विषयावरून टीका होत असताना, आकडेवारी मात्र काहीशी वेगळी स्थिती दर्शवत आहे. अमेरिकेने लादलेल्या कडक शुल्कानंतरही नोव्हेंबर महिन्यात भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 22.61 टक्क्यांनी वाढून 6.98 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात भारताची अमेरिकेला झालेली निर्यात 11.38 टक्क्यांनी वाढून 59.04 अब्ज डॉलर झाली आहे, तर आयात 13.49 टक्क्यांनी वाढून 35.4 अब्ज डॉलरवर गेली आहे.