हरयाणातील सिकरी येथील एका नामांकित रिसॉर्टमध्ये शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा प्रकार समोर आला आहे. येथील 'मिलान रिसॉर्ट'मधील बँक्वेट हॉलमध्ये स्त्री आणि पुरुष प्रसाधनगृहाचा मार्ग दाखवण्यासाठी ज्या प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत, त्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. या प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनीबाई यांच्या असल्याचा दावा केला जात असून, हा थेट हिंदू आस्थेचा अपमान असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सिकरीमधील मिलान रिसॉर्टच्या बँक्वेट हॉलमध्ये प्रसाधनगृहांची विभागणी दर्शवण्यासाठी दरवाजांवर प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. ही प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशाभूषेशी आणि प्रतिमेशी मिळतीजुळती आहे. तर महिलांच्या प्रसाधनगृहाबाहेर प्रतिमा राणी पद्मिनीबाई यांच्या रूपाशी मिळतीजुळती असल्याचा आक्षेप घेतला जात आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत सर्वात मोठा खुलासा; काय म्हणाले CM फडणवीस?)
शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांचा संताप
हा प्रकार उघडकीस येताच महाराष्ट्र आणि हरयाणातील शिवप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसाधनगृहासारख्या ठिकाणी महापुरुषांशी मिळत्याजुळत्या प्रतिमा वापरणे हा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचे म्हटले जात आहे. या प्रतिमा तातडीने हटवून रिसॉर्ट प्रशासनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
दोषींना जेलमध्ये टाकलं पाहिजे- रोहित पवार
रोहित पवार यांनी याबाबत म्हटलं की, असं कुठे झालं असेल तर लगेच कारवाई करणे म्हणत्वाचे आहे. महापुरूष आणि महामानवांचा अवमान झाला नाही पाहिजे. तातडीने हे रिसॉर्ट बंद केलं पाहिजे. कोण किती कुणाच्या जवळचा आहे की विरोधातला आहे हे न पाहता लगेचा कारवाई करून हे रिसॉर्ट अनेक काळ बंद राहणे गरजेचं आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रात त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे इथून लगेच फोन करून कारवाई केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने सरकारचं आपल्याला अभिनंदन करता येईल. दोषींना जेलमध्ये पाठवावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं.
"हरीयाणा विधीमंडळच्या पटलावर कार्यवाही करावी"
राजे मुधोजी भोसले यांनी याबाबत म्हटलं की, देवघरात ज्यांच स्थान आहे, अखंड हिंदुस्तानाचे दैवत #छत्रपती_शिवाजी_महाराज! याच महाराजाची विडंबना करणारा हरियाणा, सिक्री येथील Milan Banquet Hall मधील संतापजनक प्रकार! छत्रपती शिवाजी महाराज व राणी पद्मावतीच्या प्रतिमांचा वॉशरूमबाहेर वापर केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही कृती ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा अवमान असून सर्व धर्मीय समाजाच्या भावना दुखावणारी आहे. या हॉल/रिसोर्ट चे मालक माजी मंत्री, मुलचंद शर्मा व संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. तसेच हरीयाणा सरकारने सुद्धा गंभीर दखल घेऊन हरीयाणा विधीमंडळच्या पटलावर कार्यवाही करावी, अशी मागणी देखील राजे मुधोजी भोसले यांनी केली.