मणिपूरच्या नारनसेना भागात रात्री उशिरा कुकी उग्रवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान हे जखमी झाले आहेत. हे जवान मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील नारनसेना इथे तैनात होते. शुक्रवारी मणिपूरमध्ये लोकसभेचे मतदान झाले. मतदान संपल्यानंतर काही तासातच या ठिकाणी हा हल्ला झाला आहे.
हेही वाचा - तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार?
मणिपूरमध्ये लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर काही तासात सीआरपीएफच्या चौकीला लक्ष करण्यात आले. बिष्णूपूर जिल्ह्यातील नारनसेना गावातील डोंगराळ भागातून गोळीबार करण्यात आली. त्याच वेळी सीआरपीएफच्या चौकीवर एक बॉम्बही टाकण्यात आला. त्यावेळी मोठा स्फोट झाला. त्यात चार सीआरपीएफचे जवान जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे गंभीर जखमी आहेत, अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा
दरम्यान मणिपूरमध्ये लोकसभेसाठी 75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कुमार झा यांनी दिली आहे. मतदाना दरम्यान कुठेही हिंसक घटना किंवा गडबड झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र मतदान झाल्यानंतर या झालेल्या हल्ल्यामुळे निवडणुकीला कुठेतरी गालबोट लागले आहे.