जाहिरात
Story ProgressBack

तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार?

Read Time: 3 min
तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार?
सांगली:

सांगली लोकसभा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हटलं तर सांगली असं एक समिकरण होतं. सांगली हा तसा काँग्रेसचा अभेद्य गड.1962 पासून अगदी 2009 पर्यंत या मतदार संघातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. वसंतदादा पाटलांनी हा गड अभेद्य बनवला होता. वसंतदादा असतील, प्रकाशबापू असतील किंवा मदन पाटील, प्रतिक पाटील असतील त्यांनी हा गड राखला होता. अगदी आणीबाणीच्या काळातही काँग्रेसचा उमेदवार सांगलीतून विजयी झाला होता.  पण 2014 च्या निवडणुकीत या गडाला तडा गेला. त्यानंतर सांगलीत काँग्रेसची एकएक बलस्थाने खालसा झाली. भाजपने त्यावर वर्चस्व मिळवले. आता या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. भाजप,शिवसेना आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - 'उबाठा' ला बाळासाहेब ठाकरेंची लाज वाटते, शिवसेनेचा थेट आरोप

संजयकाका पाटील यांना पुन्हा मैदानात 

भाजपने पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मुळचे राष्ट्रवादीचे असलेले संजयकाका 2014 ला ऐन वेळी भाजपात आले आणि खासदार झाले. त्यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले आहे. मोदी लाटेत संजयकाका विजयी झाली. 2019 ला झालेल्या तिरंगी लढतीतही संजय काका यांचा फायदा झाला आणि ते विजयी झाले. यावेळी मात्र स्थिती वेगळी आहे. यावेळीही तिरंगी लढत होत असली तरी संजयकाका पाटील यांच्याबाबत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. स्वकीयांचा असलेला विरोध हीच मोठी दोघेदुखी संजयकाकां समोर आहे. असं असलं तरी विशाल पाटील यांच्या विरोधात काका आक्रमत झाले आहेत. पाटील घराण्याच सलग तिसऱ्यांदा पराभव करणार अशी शपथचं त्यांनी घेतली आहे. 

विशाल पाटील बाजी मारणार? 

काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटील यांना होती. त्यानुसार त्यांनी शेवटपर्यंत वाट पाहीली. अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला. काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळेल यासाठीही प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. दुसरीकडे प्रतिक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. अखेर ही जागा शिवसेनेकडेच गेले. त्याबाबत जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी नाराजी ही व्यक्त केली. शिवाय विश्वजीत कदम यांनीही ती जाहीर पणे बोलून दाखवली. आता विशाल पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत. ते अपक्ष म्हणून मैदानात असले तरी त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच साथ मिळणार आहे. त्यांची स्वत:ची ताकद मतदार संघात आहे. शिवाय कार्यकर्त्यांचे जाळेही आहे. सांगली लोकसभेतील दोन मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत ही पण त्यांच्या जमेची बाजू आहे. मागील निवडणुकीत वंचितच्या पडळकरांमुळे विशाल पाटील यांचे गणित बिघडले होते. ते यावेळी सुधारण्याचे काम विशाल पाटील यांनी हाती घेतले आहे. वसंतदादा घराण्यातील असल्याचा फायदाही विशाल यांना होऊ शकतो. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.    

चंद्रहार पाटील यांचा टिकाव लागणार का? 

महाविकास आघाडीत हा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला गेला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे गणित शिवसेनेने मांडले. शिवाय परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. तसं पाहाता या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद नाही. खानापूर आटपाडी मतदार संघात शिवसेनेचा एक आमदार होता. मात्र तेही शिंदें बरोबर गेले. अशा स्थितीत ठाकरेंनीही ही जागा आपल्याकडे घेतली आहे. अशा वेळी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत त्यांना होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्याचा मुलगा संसदेत जाणार असा प्रचार चंद्रहार पाटील करत आहेत. पण तो निवडणुकीच्या मैदानात विरोधकांना चितपट करण्यासाठी किती फायद्याचा ठरले याबाबत अनिश्चितता आहे. 

सांगली लोकसभेचे बलाबल काय? 

सांगली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यात जत, तासगाव, खानापूर, पलूस, सांगली आणि मिरज समावेश होतो. त्या पैकी पलूस आणि जत विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत.तर तासगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. खानापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार आहे. तर सांगली आणि मिरजमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे दोन आमदार काँग्रेस आणि भाजपचे आहेत. तर एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे विधानसभा नुसार विचार करता आघाडी आणि युती समसमान जागांवर आहे. याचा फायदा मात्र आता कोणाला होतो हे निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होणार आहे.  

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination