Video : '112 नंबरवर कॉल करेन..' केजरीवालांच्या घरी 'त्या' दिवशी काय घडलं?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरातील एक व्हिडिओ समोर आलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
स्वाती मालीवाल यांनी FIR दाखल केली आहे.
नवी दिल्ली:

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी कथित गैरवर्तन केल्याचं प्रकरण आता चांगलंच तापलंय. या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर स्वाती मलिवाल यांची जबानी नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात एक व्हिडिओ आता समोर आलाय. त्यामध्ये केजरीवाल यांच्या घरातील ड्रॉईंग रुमधील सोफ्यावर मालीवाल बसलेल्या दिसतात. त्यावेळी सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे व्हिडिओ?

दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानातील या व्हिडिओमध्ये मी 112 नंबरवर कॉल करेन असं स्वाती मलीवाल सांगताना दिसत आहेत. तुम्ही मला स्पर्श करु शकत नाही. मी तुम्हाला नोकरीवरुन काढून टाईन. आज तमाशा होऊ दे..' असं देखील त्या यावेळी म्हणाल्या. मालीवाल यांनी या प्रकरणात दिल्लीतील तीस हजारी कोर्टात त्यांची जबानी दिली आहे. 

'आप'च्या खासदारांनी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला दिलेल्या जबाबात सांगितलं की, मी खोलीत प्रतीक्षा करीत होती. त्यावेळी बिभव आले आणि मला शिव्या देऊ लागले. काहीही कारण नसताना ते मला मारहाण करीत होते. मी आरडाओरडा करीत होते, पण तरीही ते मला मारहाण करीत होते. पुढे मालीवाल म्हणाल्या, बिभव कुमार तिला धमकी देत होते. मला मासिक पाळी सुरू असल्याचं सांगितल्यानंतरही ते शांत बसले नाही. त्यांनी मला पोटावर, छातीवर आणि चेहऱ्यावर वार केलं. कशी बशी मी तेथून पळून गेल्याचं त्या म्हणाल्या. 

( नक्की वाचा : स्वाती मालीवालांच्या तक्रारीनंतर FIR दाखल; दिल्लीच्या AIIMS मध्ये झाली वैद्यकीय तपासणी )
 

राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केलेल्या या आरोपांची दखल राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली आहे. आयोगानं केजरीवाल यांच्या स्वीय सचिव बिभव कुमार यांना शुक्रवारी हजर राहण्याचं समन्स बजावलंय. तर दिल्ली भाजपानं या प्रकरणात केजरीवाल यांना लक्ष्य केलंय.

'मुख्यमंत्री निवास्थानामध्ये  एका महिलेवर या पद्धतीचा अत्याचार झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी. त्यांनी बिभव कुमार यांना पोलिसांच्या स्वाधीन करावं. बिभव कुमार यांना पंजाब किंवा अन्यत्र कुठं लपवलेलं असू शकतं. दिल्ली पोलिसांनी तातडीनं त्यांना अटक करावी तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करावी, अशी मागणी दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केलीय.