Mahua Moitra vs Jai Anant Dehadrai: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि वकील जय अनंत देहाद्राई यांच्यात पाळीव कुत्र्याच्या (Henry) ताब्यावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "तुम्ही दोघे एकत्र बसून हा प्रश्न का मिटवत नाही?" असा संतप्त सवाल न्यायालयाने त्यांना विचारला. या दोघांमधील वाद संसदेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांपर्यंत पोहोचला होता.
काय आहे प्रकरण?
महुआ मोईत्रा आणि त्यांचे वकील मित्र जय अनंत देहाद्राई यांच्यात पाळीव कुत्रा हेन्रीच्या ताब्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. मोईत्रा यांनी हेन्रीला सोबत ठेवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर देहाद्राई यांनी ट्रायल कोर्टाच्या त्या आदेशाला आव्हान दिले आहे. या प्रकरणात देहद्राई यांना सार्वजनिक बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोर्टात काय घडले?
न्यायमूर्ती जैन यांनी महुआ मोईत्रा यांच्या याचिकेवर, "त्यांना नेमका कोणता दिलासा हवा आहे?" असा प्रश्न विचारला. देहाद्राई यांचे वकील संजय घोष म्हणाले, की त्यांच्या अशिलावर दाखल केलेला खटला निरर्थक आहे आणि त्यांना याबद्दल सार्वजनिकपणे बोलण्यापासून रोखणे हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. ते म्हणाले, की "माझ्यावर एक निरर्थक केस दाखल केली गेली आहे आणि मी त्याबद्दल बोलू शकत नाही, लिहू शकत नाही? जिथे निष्पक्षतेचा प्रश्न नाही, तिथे हे का गरजेचे आहे? त्या एक खासदार आहेत, म्हणून त्यांना सामान्य नागरिकापेक्षा जास्त हक्क मिळतात का?"
( नक्की वाचा : 'माझी आई या जगात नाही, तरी तिला...' काँग्रेसच्या सभेत आईचा अपमान झाल्यानं PM मोदी भावुक )
वादाचा इतिहास काय?
हा संपूर्ण वाद 2023 पासून सुरू आहे. देहाद्राई यांच्या तक्रारीनंतरच महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप झाला होता. लोकसभेच्या एथिक्स कमिटीने त्यांना बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याबद्दल दोषी ठरवले होते. देहाद्राई यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्यामार्फत तक्रार केली होती, की मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदाणी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी लाच घेतली. त्यानंतर त्यांना संसदेतून निलंबित करण्यात आले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता डिसेंबरमध्ये होणार आहे. न्यायालयाने मोईत्रा यांना या प्रकरणात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.