
PM Modi's Response to Abuse Incident at Bihar Congress Rally : बिहारच्या दरभंगा येथील 'व्होटर अधिकार यात्रा' दरम्यान काँग्रेस-आरजेडीच्या मंचावरून पंतप्रधान मोदींच्या आईचा अपमान करण्यात आला होता. त्यांना अपशब्द वापरले होते. यावरून पंतप्रधान मोदी (PM Modi Mother Heeraben) यांनी दोन्ही पक्षांना जोरदार फटकारले आहे. 'बिहार राज्य जीविका निधी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड'च्या उद्घाटनादरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान म्हणाले की, "आईच्या आशीर्वादानेच मी देशाची सेवा करत आहे. प्रत्येक आईची इच्छा असते की तिच्या मुलाने तिची सेवा करावी. पण माझ्या आईने स्वतःसाठी नव्हे तर तुमच्यासारख्या कोट्यवधी माता आणि भगिनींच्या सेवेसाठी मला स्वतःपासून वेगळं होऊन जाण्याची परवानगी दिली. अशा आईला शिवीगाळ करण्यात आली."
'माझी आई या जगात नाही, तरी....
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझ्या आईचे शरीर आता या जगात नाही. काही काळापूर्वी 100 वर्षांच्या वयात त्यांचे निधन झाले. माझ्या आईचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. त्या आईला काँग्रेस-आरजेडीच्या मंचावरून शिवीगाळ करण्यात आली. हे पाहून काही माता-भगिनींना खूप वेदना झाल्या. हे खूप दुःख, कष्ट आणि वेदना देणारे आहे. त्या आईचा काय गुन्हा होता, जिला अशा शिवीगाळ ऐकाव्या लागल्या. माझ्या आईला शिवीगाळ करणे हा बिहारचा अपमान आहे."
( नक्की वाचा : 'राजकीय पोळी भाजू नका, नाहीतर तोंड भाजेल'; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले )
'केवळ माझ्या आईचा नाही, तर देशातील माता, भगिनी आणि मुलींचाही अपमान'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझ्या आईचा सन्मान ही बिहारची ओळख आहे. माझ्या आईला शिवीगाळ करणे हा बिहारचा अपमान आहे." ते पुढे म्हणाले की, "आईच आपले जग, आपला स्वाभिमान असते. या समृद्ध परंपरा असलेल्या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जे घडले, त्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेसच्या मंचावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली. ही शिवीगाळ केवळ माझ्या आईचा अपमान नाही, तर देशातील प्रत्येक माता, भगिनी आणि मुलीचा अपमान आहे. बिहारमधील प्रत्येक आईला हे पाहून-ऐकून किती वाईट वाटले असेल, याची मला कल्पना आहे. मला माहित आहे की, जितका त्रास मला झाला आहे, तितकाच त्रास माझ्या बिहारच्या लोकांनाही झाला आहे."
'माझ्या आईने खूप कष्ट सहन केले, आई मुलांना अशीच वाढवते'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "प्रत्येक आई आपल्या मुलांना खूप तपस्या करून वाढवते. मुलांपेक्षा मोठे आईसाठी काहीच नसते. मीही लहानपणापासून माझ्या आईला असेच पाहिले आहे. त्यांनी खूप गरिबी आणि कष्ट सहन करून आपल्या कुटुंबाला, आम्हा सर्व भावंडांना वाढवले. पावसाळा येण्याआधी आई छप्पर गळू नये यासाठी प्रयत्न करायची जेणेकरून तिची मुलं शांतपणे झोपू शकतील. ती आजारी असली तरी ते कळू देत नव्हती. ती काम करत राहायची. तिला माहित होते की जर तिने एक दिवसही आराम केला तर आम्हा मुलांना त्रास होईल. तिने माझ्या वडिलांनाही अडचणी कळू दिल्या नाहीत. तिने स्वतःसाठी कधीच नवीन साडी घेतली नाही. ती एक-एक पैसा जमा करायची, जेणेकरून मुलांसाठी एक जोड कपड्यांचा शिवू शकेल. देशातील कोट्यवधी माता आपल्या मुलांना अशाच प्रकारे वाढवतात."
( नक्की वाचा : धक्कादायक खुलासा! नोबेलसाठी ट्रम्प यांचा मोदींना फोन, 'ती' मागणी फेटाळताच संबंध बिघडले )
'शाही घराण्यात जन्माला आलेले युवराज गरीब आईच्या वेदना समजू शकत नाहीत'
"एक गरीब आई आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण आणि संस्कार देते. म्हणूनच आईला देवी-देवतांपेक्षाही उच्च स्थान दिले जाते. बिहारमध्येही आईला देवता आणि पूर्वजांपेक्षा वरचे स्थान दिले जाते. काँग्रेस-आरजेडीच्या मंचावरून माझ्या आईलाच नव्हे तर कोट्यवधी मातांना शिवीगाळ करण्यात आली. एका गरीब आईची तपस्या आणि एका मुलाच्या वेदना हे शाही घराण्यात जन्माला आलेले युवराज समजू शकत नाहीत. हे लोक सोन्या-चांदीचे चमचे घेऊन जन्माला आले आहेत,'' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता केली.
पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'बिहार राज्य जीविका निधी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड'चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ग्रामीण महिला उद्योजकांच्या खात्यात 105 कोटी रुपये हस्तांतरित केले. याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी बिहारच्या दरभंगा येथे काँग्रेस-आरजेडीच्या मंचावरून त्यांच्या आईचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world