केजरीवालांवर विषप्रयोग केला जात असल्याचा 'आप'चा आरोप, उपचार दिले जात नसल्याने ठाकरेंची टीका

केजरीवाल हे आंबे खात असल्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी खळबळजनक आरोप केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर तुरुंगात विषप्रयोग केला जात असल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. केजरीवाल यांना स्लो पॉयझन दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवाल यांची हत्या करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

माजी मंत्री आणि शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनीही केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांना दिल्या जात असलेल्या उपचारांबाबत चिंता व्यक्त करणारी एक पोस्ट X वर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,

Advertisement
"केजरीवाल हे कोठडीत असून त्यांची प्रकृती खालावली असतानाही त्यांना योग्य उपचार दिले न जाणं ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीतील हा अंधकारमय काळ आहे. भारताच्या लोकशाही मूल्यांना कसा काळीमा फासला जातोय हे संपूर्ण जग पाहात आहे. एखाद्याचे राजकीय विचार आपल्याशी मिळते जुळते नसले तरी त्या व्यक्तीला अशी वागणूक मिळता कामा नये"
Advertisement

आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले की, केजरीवाल यांनी तुरुंगातील डॉक्टरांना वारंवार सांगितले की त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत आहे. मला इन्सुलिन देण्यात यावे. मात्र तुरुंगातील डॉक्टर म्हणतायत की केजरीवाल खोटं बोलत आहेत. पोलीस महासंचालक आणि उपमहासंचालकांनाही केजरीवाल यांनी इन्सुलिन देण्याची विनंती केली मात्र त्यांनीही ती धुडकावून लावली असा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.

Advertisement

आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी X वर केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण शेअर केले आहे. 12 ते 17 एप्रिल या काळातील ही आकडेवारी असल्याचे मार्लेना यांनी म्हटले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण इतके जास्त असेल तर त्या रुग्णाचे अवयव हळूहळू निकामी व्हायला लागतात. मधुमेहाच्या रुग्णाला इन्सुलिन नाकारणारे हे सरकार क्रूर असल्याची टीका मार्लेना यांनी केली आहे. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले की, इन्सुलिनसाठी केजरीवाल यांना विनंती करावी लागत आहे. 15 दिवसांपासून त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत चालले आहे. असे असतानाही त्यांना इन्सुलिन देण्यात आले नाही.

केजरीवाल यांनी त्यांच्या खासगी डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सल्लामसलत करण्याची परवानगी मागितली आहे, मात्र तीही देण्यात येत नसल्याचा दावा आपकडून केला जात आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यास केजरीवाल यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो, जर त्यांची किडनी फेल झाली तर नायब राज्यपाल विजय सक्सेना केजरीवालांना किडनी आणून देणार आहे का असा सवालही भारद्वाज यांनी विचारला आहे. केजरीवाल हे आंबे खात असल्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Topics mentioned in this article