पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी तरुणाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी मदत

Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांपासून पर्यटकांचं संरक्षण करताना सय्यदनं जीव गमावला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल, 2025) पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सय्यद आदिल शाह या 20 वर्षांचा काश्मिरी तरुणाचा देखील मृत्यू झाला. दहशतवाद्यांपासून पर्यटकांचं संरक्षण करताना सय्यदनं जीव गमावला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. पहलगाममध्ये मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज (शुक्रवार, 25 एप्रिल) सय्यदच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बुधवारी रात्री उशीरा श्रीनगरमध्ये पोहोचले. त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद  आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याची दखल घेत  शिंदे यांनी सय्यद आदिलच्या कुटुबियांनामदत देण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli : 'दुकान आणि हॉटेल व्यावसायिकांनी मुस्लिमांना कामावर ठेवू नये,' भाजपाचा इशारा, राजकारण तापले! )
 

त्यानुसार आज सय्यद आदिलच्या कुटुंबियांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. त्याने पर्यटकांच्या बचावासाठी कशाप्रकारे दहशतवाद्यांशी मुकाबला केला. रायफल खेचली आणि दहशतवाद्यांनी त्याला कशा गोळ्या घातल्या याचा अनुभव त्याने सांगितला. 

Advertisement

सय्यद आदिलने बहादुरी दाखवत माणुसकीचे अनोखे उदाहरण जगासमोर दाखवून दिले आहे, त्याचे हौतात्म्य वाया जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शाह कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करू, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. 

Advertisement
Topics mentioned in this article