शहीद जवानाच्या पत्नीने आपल्याला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसं निवेदन त्यांनी दिलं आहे. राजस्थानमधील झुंझुनूं जिल्ह्यातील चिंचडौली गावातील शहीद वीरांगना ओम कंवर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन दिलं आहे. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्या जमिनीवरून वाद सुरू आहे, परंतु अद्याप कोणतीही सुनावणी झाली नाही. सततची छळवणूक आणि न्यायाची उपेक्षा यामुळे दुखावलेल्या ओम कंवर यांनी प्रशासनाकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
ओम कंवर यांनी सांगितले की 19 जुलै 2025 रोजी त्यांचे शेजारी विकेंद्र सिंह, आनंद सिंह, राजू कंवर आणि सुरज्ञान कंवर यांनी त्यांच्या शेतावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध केल्यावर, त्यांचे तोंड दाबून त्यांना शेतातून बाहेर फेकण्यात आले. यानंतर, या घटनेची तक्रार बगड पोलीस ठाण्यात करण्यात आली. तक्रार देखील दाखल झाली. परंतु पोलिसांनी साक्षीदार आणण्याचे सांगून प्रकरण टाळले. एकट्या राहणाऱ्या ओम कंवर यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे साक्षीदार आणण्यासाठी कोणतेही साधन नाही.
या घटनेच्या दोन दिवसांनंतर, त्यांच्या दीराच्या मुलावर, विक्रम सिंहवर, विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. ओम कंवर यांचा आरोप आहे की, हे सर्व त्यांना आणखी त्रास देण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. त्यांनी निवेदनात लिहिले आहे, "मी पूर्णपणे खचले आहे, न्यायाच्या आशेने पोलीस ठाण्यांच्या आणि कार्यालयांच्या फेऱ्या मारून थकून गेले आहे." "माझ्या जमिनीवर स्थगिती असतानाही, ती लोकं घर बांधत आहेत. जेव्हा मी विरोध करते, तेव्हा मला धमकी दिली जाते की 'जमीन आमच्या नावावर कर, नाहीतर तुला जीवे मारू.' मी एकटी शहीद वीरांगना आहे, या लोकांशी मी कशी मुकाबला करू?" असं त्यांचं म्हणणं आहे.
शहीद वीरांगनांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर पुढे म्हटले की, जर त्यांना न्याय मिळाला नाही, तर त्यांचे पती शहीद सुरेंद्र सिंह यांच्या नावाने चिंचडौली गावात बांधलेल्या शाळेचे नाव काढण्यात यावे. त्यांचे पुत्र नरपत सिंह यांची पोस्टिंग गुलमर्ग येथे आहे, त्यांना मला भेटण्याची परवानगी द्यावी. तसेच, त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या शेतातच करण्यात यावा. त्यांनी सांगितले की, मी आठ महिन्यांपासून न्यायासाठी भटकत आहे. तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. आता त्यांच्याकडे इच्छा मृत्यू शिवाय पर्याय नाही असं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.