ED ने एक मोठी कारवाई केली आहे. एका जमिन घोटाळ्या संबंधीत चौकशी करताना मोठा घोटाळा तर उघड झालाच आहे, पण ईडीच्या छाप्यात मोठं घबाड ही हाती लागलं आहे. गोव्यात जमीन हडपल्याचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोवा आणि हैदराबादमधील 13 ठिकाणी छापे टाकले. गोव्यात ही कारवाई अंजुना आणि असगांव परिसरातील सोसायट्यांच्या जमिनींवर केलेल्या बेकायदेशीर कब्जाशी संबंधित आहे.
या जमिन घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, यशवंत सावंत आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या बनावट कागदपत्रांचा वापर करून सुमारे 3.5 लाख चौरस मीटर जमीन आपल्या नावावर केली. यापैकी काही जमिनी विकून कोट्यवधी रुपये कमावले. या जमिनींची किंमत 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. यातून हे लोक गब्बर श्रीमंत झाले. पण त्यांनी ही जमिन चुकीच्या मार्गाने लाटली आहे.
या प्रकरणात कारवाई करताना छाप्यांमध्ये ED ला 72 लाख रुपये रोख मिळाले आहेत. शिवाय 7 लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. त्यात पोर्शे, बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, मर्सिडीज यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आरोपींची अनेक बँक खाती आणि एफडी (FD) देखील सील करण्यात आली आहेत. ED ने सांगितले की, तपास अजूनही सुरू आहे. यातून गोव्यातील आणखी मोठ्या जमीन हडपण्याच्या नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकतो. त्यामुळे पुढील तयार ईडी आणखी कसून करत आहे. यात काही बडे मासे फसण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.