
नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहेत. राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून पर्यटक हे जात असतात. मात्र तिथे निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे ते तिथे अडकले आहेत.
नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. नेपाळला महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी आहे. याच सिजन मध्ये नेपाळच्या सहलींचे आयोजन केले जाते. मात्र या वर्षी तिथे झालेल्या हिंसक आंदोलनाचा फटका सर्वच पर्यटकांना बसवा आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. मात्र सरकारने त्यांना दिलासा दिला आहे.
राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खाजगी वाहनाने परत यायला निघालेले आहेत. ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
नेपाळमध्ये ‘जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरावर हल्ला करून त्याला आग लावण्यात आली. या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे आंदोलनातील मृतांची संख्या 19 पेक्षा झाली आहे. तर पंतप्रधान, राष्ट्रपतींसह महत्वाच्या नेत्यांनी राजीनामे देवून दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे. सध्या नेपाळची स्थिती स्फोटक बनली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world