जर तुमच्या मोबाइल फोनवर अचानक मोठा 'बीप' आवाज आला किंवा आपत्तीसंबंधी अलर्ट वाजू लागला, तर गोंधळून जाऊ नका. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) आपत्कालीन दळणवळण यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी शनिवार, 2 मे 2026 रोजी 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम'ची राष्ट्रव्यापी चाचणी घेण्याचे ठरवले आहे.
चाचणीदरम्यान काय घडणार?
भारतात नवीन सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम विकसित करण्यात आले असून सध्या त्याची देशभर चाचणी सुरू आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांना तात्काळ सूचना देण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. या ड्रिलमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या मोबाइल स्क्रीनवर अचानक एक आपत्कालीन सूचना (Emergency Alert) दिसेल. या सूचनेसोबत एक मोठा विशिष्ट आवाज किंवा तीव्र व्हायब्रेशन देखील होऊ शकते. हा केवळ एक 'टेस्ट मेसेज' असेल, ज्याचा उद्देश यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी करणे हा आहे.
पाहा Video
(नक्की वाचा- JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त)
काय असेल मेसेज?
“भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे. भारत सरकार.” असा मेसेज मोबाईलवर येऊ शकतो.
सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत थेट मोबाईलद्वारे माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. भूकंप, त्सुनामी, वीज पडणे, गॅस गळती किंवा रासायनिक धोका अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीवेळी हा अलर्ट उपयोगी ठरणार आहे. यापूर्वीही काही वेळा या प्रणालीची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, आता देशभरात व्यापक स्तरावर चाचणी घेऊन प्रणालीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासली जात आहे.
चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल आणि विविध भारतीय भाषांमध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांना आपत्कालीन सूचना पाठवल्या जातील.
(नक्की वाचा- Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, सैराटलाही टाकलं मागे)
कोणत्या राज्यांमध्ये होणार चाचणी?
दिल्ली-NCR सह सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीच्या शहरांमध्ये ही ड्रिल घेतली जाईल. सीमावर्ती भाग आणि ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत, त्या भागांना या चाचणीतून वगळण्यात आले आहे.