PM Modi Viral Post Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल- डिझेलची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर वेगवेगळ्या अफवांना ऊत आला आहे. देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? वर्क फ्रॉम होमची घोषणा होणार का? की इंधनाची भीषण टंचाई जाणवणार? असे विविध सवाल उपस्थित केले जात आहेत. अशातच पंतप्रधान मोदींनी आठवड्याच्या प्रत्येक रविवारी देशातील पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची घोषणा केल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आता या व्हायरल पोस्टमागचे नेमकं सत्य समोर आले आहे.
यापुढे प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार?
समोर आलेल्या माहितीनुसार, माध्यमांमधील तणाव आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, इंधनाची बचत करण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या पोस्टमुळे खरंच शहरातील पेट्रोल पंप बंद असतील का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहतील, म्हणजेच कोणालाही इंधन भरता येणार नाही. व्हायरल पोस्टमध्ये नरेंद्र मोदी आणि एका पेट्रोल पंपाचा फोटो दाखवण्यात आला आहे. हा नियम आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये लागू होईल, असाही दावा यामध्ये करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
PIBने सांगितले व्हायरल पोस्टचे सत्य
जेव्हा पीआयबीने व्हायरल फोटोची चौकशी केली, तेव्हा त्यांना आढळले की त्यात काहीही तथ्य नाही. वास्तविक, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी कोणतीही घोषणा किंवा आवाहन केलेले नाही. ही पोस्ट बनावट आहे. पीआयबीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले आहे की, हा दावा खोटा आहे आणि तुम्ही असे पडताळणी न केलेले संदेश शेअर करू नयेत. नेहमी सतर्क राहा आणि केवळ विश्वसनीय स्रोतांकडूनच माहिती मिळवा. पीआयबीने सर्वांना आवाहन केले आहे की, जेव्हाही त्यांना अशा खोट्या बातम्या आढळतील तेव्हा त्यांनी पीआयबीशी ईमेल (factcheck@pib.gov.in) आणि व्हॉट्सॲप (+91 8799711259) द्वारे संपर्क साधावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world