Victory Sign Pose Alert: जर तुम्हीही फोटो काढताना अनेकदा व्हिक्टरी पोझ (Victory or Peace Sign) देत असाल, तर आता सावध व्हा. हॅकर्स तुमच्या सेल्फीमधून बोटांचे ठसे चोरण्यासाठी एआय (AI) चा वापर करू शकतात, असा इशारा सायबर सुरक्षा तज्ञांनी दिला आहे. हा धोका केवळ गोपनीयतेपुरता मर्यादित नाही; यामुळे तुमची ओळख म्हणजे वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते (identity theft) आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.
सेल्फीमुळे ओळख चोरण्याची भिती
आजकाल लोक दररोज सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करतात. सेल्फी काढताना व्हिक्टरी पोझ देणे ही एक सामान्य स्टाईल झाली आहे. पण ही सवय आता तुमच्यासाठी एक मोठा धोका निर्माण करू शकते. सायबर सुरक्षा तज्ञ ली चांग यांनी अलीकडेच एका चीनी टीव्ही शोमध्ये दाखवून दिले की एआय (AI) आणि फोटो एडिटिंग टूल्सचा वापर करून कोणाचेही बोटांचे ठसे कसे काढता येतात. कॅमेऱ्याकडे रोखलेल्या बोटांमधून मोठ्या प्रमाणात फिंगरप्रिंट डेटा मिळवता येतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एका सेलिब्रिटीच्या सेल्फीचा वापर केला.
ली चांग यांच्या मते, जर फोटोमधील बोटांची टोके कॅमेऱ्याकडे असतील आणि फोटो सुमारे १.५ मीटर अंतरावरून काढला असेल, तर बोटांचे ठसे स्पष्टपणे काढता येतात. १.५ ते ३ मीटर अंतरावरून काढलेल्या फोटोंमधूनही सुमारे अर्धा फिंगरप्रिंट डेटा मिळवता येतो. एआय टूल्स आणि फोटो एन्हांसमेंट तंत्रज्ञानाच्या मदतीने, अस्पष्ट खुणादेखील अधिक स्पष्ट करता येतात, असंही त्यांनी सांगितले.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका अहवालानुसार तज्ञांचे म्हणणे आहे की पासवर्ड बदलता येतात परंतु बोटांचे ठसे आणि चेहऱ्यांसारखी बायोमेट्रिक माहिती कायमस्वरूपी असते. जर हा डेटा चुकीच्या लोकांच्या हाती लागला, तर त्यामुळे आयडेंटीटी चोरी, बँक फसवणूक आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो शेअर करताना लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सायबर तज्ज्ञांचा मोठा इशारा
गुगलच्या थ्रेट इंटेलिजन्स ग्रुपच्या एका अलीकडील अहवालात असेही उघड झाले आहे, की एआय-आधारित हॅकिंगमध्ये वेगाने वाढ होत आहे. अहवालानुसार, चीन, रशिया आणि उत्तर कोरियाशी संबंधित अनेक सायबर गट त्यांचे हल्ले अधिक जलद आणि धोकादायक बनवण्यासाठी एआय मॉडेल्सचा वापर करत आहेत. अहवालात म्हटले आहे की जेमिनी, क्लाउड आणि ओपनएआय सारख्या प्रगत एआय टूल्सच्या मदतीने, हॅकर्स आता अधिक अत्याधुनिक मालवेअर विकसित करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले करत आहेत.
गुगलचे मुख्य विश्लेषक, जॉन हल्टक्विस्ट यांनी म्हटले आहे की, एआयमुळे सायबर हल्ल्यांचा वेग, क्षमता आणि धोका पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. दरम्यान, एआय कंपनी अँथ्रोपिकने अलीकडेच आपले नवीन एआय मॉडेल, 'मिथोस', सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे. कंपनीने म्हटले आहे की, हे तंत्रज्ञान इतके शक्तिशाली आहे की, जर ते चुकीच्या लोकांच्या हाती लागले, तर ते सरकार, आर्थिक व्यवस्था आणि जागतिक सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world