प्रसिद्ध फॅशन इन्फ्लुएन्सर सुरभी जैन हिचे निधन झाले आहे. अंडाशयाच्या कॅन्सरने ती ग्रासलेली होती. तीस वर्षांच्या सुरभी जैनच्या निधनाने तिच्या फॉलोअर्सना धक्का बसला आहे. अवघ्या तीस वर्षांच्या सुरभीचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या घरच्यांनी सोशल मीडियाद्वारे दिले. सुरभी ही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध होती. तिला अंडाशयाचा कॅन्सर झाला होता. सुरभीने ८ आठवड्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर रुग्णालयातून तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत तिने लिहिले होते की, "मला कल्पना आहे की माझ्या प्रकृतीबाबत मी तुम्हा सगळ्यांना कळवू शकले नाही. रोज येणारे मेसेज पाहिल्यानंतर हे योग्य नसल्याचे मला जाणवले. मात्र इथे परिस्थिती फार काही चांगली नाहीये. त्यामुळे शेअर करण्याजोगे काही नाहीये."
सुरभीने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की,"मी बहुतांश वेळ रुग्णालयात घालवला असून उपचार सुरू आहेत. हे अत्यंत कठीण आहे आणि मी आशा करते की हे सगळं लवकरच संपेल."
सुरभी हिचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या घरच्यांनी तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुरुवारी सुरभीचा मृत्यू झाला आणि १९ एप्रिल रोजी गाझियाबादमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरभीला कॅन्सर होण्याची ही दुसरी वेळ होती. ती २७ वर्षांची असताना तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी तिने म्हटले होते की, "शस्त्रक्रियेदरम्यान मला १४९ टाके घालण्यात आले. मला खूप वेदना झाल्या. मी आता स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा आणि प्रत्येक दिवसाचे स्वागत प्रसन्न हास्याने करण्यात स्वत:ला व्यस्त ठेवते."
अंडाशयाचा कॅन्सर हा महिलांना होणाऱ्या कॅन्सरपैकी एक असून हा घातक स्वरुपाचा असतो. स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कॅन्सरनंतर महिलांना होणारा अंडाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण बरेच आहे. भारतीय विज्ञान संस्थेने केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की, या कॅन्सरची लक्षणे लवकर दिसत नाही. हा कॅन्सर वेगाने पसरत जातो ज्यामुळे त्याचा शोध लागणं अवघड असतं. कॅन्सर झाल्याचे कळेपर्यंत तो पसरलेला असतो.