World's Smallest Doctor: तुमच्या आयुष्यातील ध्येय किती मोठं आहे, हे तुमच्या शरीराच्या मापावर किंवा उंचीवर अवलंबून नसतं! हे गुजरातच्या भावनगरमधील गणेश बरैया या 25 वर्षांच्या तरुणाने सिद्ध करून दाखवलंय. अवघी 3 फूट उंची आणि 18 किलो वजन असलेल्या गणेश यांना डॉक्टर होण्यापासून रोखण्यासाठी वैद्यकीय मंडळाने (Medical Board) आपली सर्व ताकद लावली.शरीराचा 72 टक्के भाग लोकोमोटर विकलांगतेमुळे (locomotor disability) प्रभावित असूनही, त्यांनी आज डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांचा हा प्रवास प्रचंड संघर्ष आणि हिंमत दाखवणारा आहे.
कोर्टापर्यंतची लढाई
NEET परीक्षा पास झाल्यानंतर, गणेश भावनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College, Bhavnagar) प्रवेश घेण्यासाठी गेले, तेव्हा वैद्यकीय मंडळाने (Medical Board) त्यांना प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला. 'इतक्या कमी उंचीमध्ये तुम्ही रुग्णांची तपासणी (examination) आणि ऑपरेशन थिएटरमधील (Operation Theatre) काम कसं करू शकाल?' असे कारण देत, मंडळाने त्यांची शारीरिक मर्यादा दाखवली.
पण गणेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी हार मानली नाही. त्यांनी पहिल्यांदा गुजरात उच्च न्यायालयात (Gujarat High Court) याचिका दाखल केली. तिथे दिलासा न मिळाल्याने त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) गाठले. गणेश यांच्या बाजूने प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला आणि महाविद्यालयाला प्रवेश देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे गणेश यांच्या डॉक्टर बनण्याच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण दूर झाली.
( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
हा मोठा विजय मिळाल्यानंतर गणेश यांनी भावनगर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पाच वर्षांचा एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. एवढेच नव्हे, तर इंटर्नशिपच्या (Internship) काळातही त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही. रुग्णालयाचे बेड (Hospital Bed) उंच असल्यामुळे ते तपासणीसाठी स्टूल (Stool) ठेवून चढतात. रुग्णांची तपासणी करताना ते आपले पाय लांब करून काम करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. सुरुवातीला रुग्ण त्यांना पाहून थोडे आश्चर्यचकित होतात, पण नंतर त्यांच्या प्रेमाच्या आणि आत्मविश्वासाच्या उपचारांमुळे समाधानाने उपचार करून घेतात.
गरीब रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न
आता गणेश बरैया यांची एमबीबीएसची पदवी पूर्ण झाली आहे. सरकारी नियमांनुसार, बॉन्ड (Bond) नुसार त्यांना काही काळ सरकारी रुग्णालयात (Government Hospital) नोकरी करायची आहे. यावेळी गणेश यांनी आपले सर्वात मोठे ध्येय सांगितले आहे.
( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
गणेश याबाबत बोलताना म्हणाले की, मला ग्रामीण भागातील गरीब लोकांवर उपचार करायचे आहेत. तिथेच चांगल्या डॉक्टरांची सर्वात जास्त गरज आहे." गणेश यांचा आता जगातील सर्वात कमी उंचीच्या डॉक्टरांच्या (World's Smallest Doctor) यादीत समावेश झाला आहे.
कच्च्या घराचे पक्के स्वप्न
मूळचे गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील गोरखी (Gorkhi) गावातील असलेल्या गणेश यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात (Farmer Family) झाला. ते आठ भावंडांपैकी एक आहेत. डॉक्टर बनल्यानंतर आता त्यांचे एक सर्वात मोठे वैयक्तिक स्वप्न आहे, ते म्हणजे आपल्या कुटुंबासाठी पक्के घर बांधणे.
आम्ही आजही कच्च्या घरात राहतो. अनेक वेळा पैशांची कमतरता आल्यामुळे घराचे बांधकाम थांबले होते. आता मला मिळणाऱ्या वेतनातून (Salary) मी हे स्वप्न पूर्ण करू शकेन," असे त्यांनी सांगितले.