Social Buzz: कॅबमध्ये प्रवास करताना अनेकदा प्रवाशांकडून होणारे गैरवर्तन किंवा असभ्य भाषा वापरली जाते. याच अनुभवांना कंटाळून एका कॅब ड्रायव्हरने थेट आपल्या कॅबमध्येच एक 'नियमावली' लावली आहे! प्रवाशांसाठी असलेल्या या सहा नियमांचा बोर्ड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेषतः 'आम्हाला भैय्या म्हणू नका' आणि 'नम्रपणे बोला' यांसारख्या नियमांमुळे कॅब ड्रायव्हर्स आणि प्रवाशांमधील वर्तनाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
काय आहे प्रकरण?
बेंगळूरूमध्ये प्रवास करत असताना एका रेडिट युजरला (Reddit user) एका कॅबच्या आतमध्ये हे नियम लिहिलेला बोर्ड दिसला. त्यांनी हा फोटो काढला आणि 'r/bangalore' नावाच्या सबरेडिटवर 'काल मला माझ्या कॅबमध्ये हे सापडले' या कॅप्शनसह पोस्ट केला. या फोटोला क्षणार्धात हजारो व्ह्यूज मिळाले आणि 1,000 हून अधिक लोकांनी तो लाईक (upvote) केला. या बोर्डावर प्रवाशांसाठी खालील सहा नियम स्पष्टपणे लिहिलेले आहेत.
( नक्की वाचा : कर्जमुक्तीचा महामंत्र! 6 वर्षांत 53 लाखांचे Home Loan फेडणाऱ्या इंजिनियरने सांगितल्या 'या' 6 खास टिप्स )
काय आहेत नियम?
1) तुम्ही कॅबचे मालक नाहीत. (तुम्ही फक्त प्रवासी आहात, हे लक्षात ठेवावे)
2) कॅब चालवणारी व्यक्तीच कॅबची मालक आहे. (मालमत्तेचा आदर करा)
3) नम्रपणे बोला आणि आदर दाखवा. (सभ्य भाषा वापरा)
4) दरवाजा हळू बंद करा. (वाहनाचे नुकसान करू नका)
5) तुमचा 'अॅटिट्यूड' (Attitude) खिशात ठेवा, कारण तुम्ही आम्हाला जास्त पैसे देत नाही आहात, त्यामुळे आम्हाला तो दाखवू नका. (प्रवासाचे भाडे दिल्याने उद्धटपणा करण्याचे लायसन्स मिळत नाही)
6) आम्हाला 'भैय्या' (Bhaiya) म्हणू नका. (समानतेने वागा)
Found this in my cab yesterday
byu/CluelessFounder_ inbangalore
सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या नियमांवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही युजर्सनी ड्रायव्हरच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय, तर काहींनी नियमांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे.
एका युजरने विचारले आहे की, "या ड्रायव्हरला 'अण्णा' (Anna) किंवा 'मोठा भाऊ' (big bro) म्हटलेले चालेल का? की फक्त आदरणीय 'शोफर' (Hon'ble chauffeur) असेच म्हणावे?"
दुसऱ्या एका युजरने नियम क्रमांक 5 वर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "नियम क्रमांक 5 काळजी करण्यासारखा आहे: जर आम्ही जास्त पैसे दिले, तर ते वाईट वागणूक सहन करतील का? तसेच, नियम क्रमांक 3 (नम्रपणे बोला) संपूर्ण सूचनांशी विरोधाभास दर्शवतो."
या नियमांचे जोरदार समर्थन करताना एका तिसऱ्या युजरने लिहिले की, "तुम्ही पाहिले आहे का, लोक निम्न-वर्गीय लोकांशी कसे वागतात? ते घरकाम करणाऱ्यांना आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्याना लिफ्ट वापरण्याची परवानगी देत नाहीत, त्यामुळे ड्रायव्हरची ही मागणी मोठी नाही. एखाद्याने तुमचा अनादर केला असेल, तर भविष्यात तसे होऊ नये म्हणून तुम्ही तुमचे नियम का सांगू नये? काही लोक वाहनांचे दरवाजे ज्या पद्धतीने बंद करतात, ते पाहून असे वाटते की दरवाजे फक्त शोभेसाठी आहेत आणि त्यांचे कोणतेही काम नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world