देशातील एक अग्रगण्य उद्योग समूह असलेल्या अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी आणि त्यांचे पुत्र जीत अदाणी यांनी 28 सप्टेंबर रोजी आसाममधील गुवाहाटी येथे दिवंगत गायक-संगीतकार झुबीन गर्ग यांच्या घरी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. झुबीन गर्ग यांचे 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना अपघाती निधन झाले होते, यामुळे आसामच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, गौतम अदाणी आणि जीत अदाणी यांनी झुबीनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
नक्की वाचा: हसत हसत पाण्यात उतरला, पुढच्याच क्षणी भयंकर.. जुबीन गर्गचा अखेरचा VIDEO समोर
रविवारी रात्री घेतली गर्ग कुटुंबीयांची भेट
गौतम अदाणी यांनी रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गुवाहाटी येथील कहिलीपारा भागातील झुबीन गर्ग यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी अदाणी समूहाचे काही वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत होते. झुबीन गर्ग यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी ही भेट दिली होती. सुमारे 30 मिनिटे गौतम अदाणी आणि त्यांचे पुत्र जीत अदाणी हे झुबीन गर्ग यांच्या निवासस्थानी होते अशी माहिती पीटीआयने दिली आहे. या दोघांनी झुबीन गर्ग यांच्या पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अदाणी पिता-पुत्रांनी झुबीन गर्ग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
झुबीन गर्ग आसामी जनतेसाठी होते 'हिरो'
झुबीन गर्ग हे केवळ गायक नव्हते, तर ते आसामच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचे प्रतीक मानले जात होते. त्यांचे संगीत आणि कला आसामी लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. उद्योग आणि कला क्षेत्रातील हे दोन भिन्न स्तंभ असले तरी, एका राष्ट्रीय स्तरावरील उद्योगपतीने आसामच्या या कलाकाराला आदरांजली वाहात कलेप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन घडवले आहे. या भेटीतून अदाणी समूहाने आसामच्या सांस्कृतिक मूल्यांचा आदर आणि सामाजिक बांधिलकी दर्शवण्याचेही काम केले आहे. गर्ग यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होण्यासाठी गौतम अदाणी आले होते.
नक्की वाचा: बॉलिवुडला मोठा धक्का! प्रसिद्ध गायकाचं निधन, स्कूबा डाइव्हिंगदरम्यान घडली मोठी दुर्घटना
19 सप्टेंबर रोजी झाले झुबीन गर्ग यांचे निधन
19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन गर्ग यांचे निधन झाले होते. सिंगापूरमध्ये 20 आणि 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ते इथे आले होते. या घटनेच्या काही तास आधीच त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी आग्रहाचे आमंत्रण शेअर केले होते. झुबीन गर्ग यांनी आसामी भाषेशिवाय हिंदी, बंगाली, तमिळ आणि मराठी भाषेतही गाणी गायली होती. 2006 मध्ये आलेल्या 'गँगस्टर' चित्रपटातील त्यांचे 'या अली' हे गाणे आजही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गर्ग यांच्या कुटुंबाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. फेब्रुवारी 2002 मध्ये त्यांची बहीण जोंकी बोरठाकूरचा कार अपघातात मृत्यू झाला होता. जोंकी ही झुबीन यांच्याप्रमाणेच गायिका होती आणि ती अभिनयही करत होती.