उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भरधाव कारने गाढ झोपेत असलेल्या सात जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाळापार-टिकरिया रोडवर शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. या अपघातात माय-लेकीचा मृत्यू झाला असून घरातील सात जण जखमी झालेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळापार-टिकरियामधील रघुनाथपूर भगवानपूर गावाजवळ एका कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या सात जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. याठिकाणी राहणारे सईदा खातून यांचे कुटुंब घरात उकाड्याने हैराण झाल्याने घराच्या बाहेर एका खाटेवर झोपले होते.
याचवेळी एक लग्न समारंभ आटोपून येणारी कार अनियंत्रित झाली आणि थेट घराच्या बाहेर झोपलेल्या सात जणांना चिरडले. या अपघातात ३० वर्षीय सईदा खातून आणि तिची 16 वर्षीय मुलगी सुफिया यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिस पथके दाखल झाली. घटनेच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गोरखपूरमधील या भीषण अपघातात पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बद्रे आलम (17), राबिया (32), मरियम (50), जुबैर (14) आणि निहाल (04) हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस आणि प्रशासनाच्या पथकाने घटनेचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, किया कारमधून प्रवास करणारे लग्नातील पाहुणे लग्न समारंभातून परतत होते. गाडीचा वेगही ताशी 100 किलोमीटरच्या आसपास होता. दरम्यान, कार अनियंत्रित झाली, रस्त्याच्या रुळावरून घसरली आणि बाजूला झोपलेल्या कुटुंबाला चिरडले. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.