दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात काडतुसे आणि गन पावडर सापडने एकच खळबळ उडाली आहे. 27 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एका सीटखाली काडतुसे आणि गन पावडर सापडल्याची माहिती आहे. क्रू मेंबरला विमानात काडतुसे आणि गन पावडर दिसताच त्याने तत्काळ इतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे, विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विमानांना बॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असताना ही घटना समोर आल्याने याची गंभीर दखल तपास यंत्रणांकडून घेतली जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एअर इंडियाने घटनेनंतर एक निवेदन जारी करत म्हटलं की, विमानात काडतुसे आणि गन पावडर असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणाचेही नुकसान झाले नाही. या घटनेची एअर इंडियाने तातडीने विमानतळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची आता वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत.
(नक्की वाचा- "एकनाथ शिंदे संकुचित विचारांचे", मनसेची माहीमच्या जागेवरून टीका)
विमाने बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या सुरुच
देशातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या येणे सुरुच आहे. गेल्या शुक्रवारी 27 विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, इंडिगो, विस्तारा आणि स्पाइसजेटच्या प्रत्येकी 7 फ्लाइटमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. तर एअर इंडियाच्या सहा विमानांनाही अशा धमक्या आल्या होत्या.
(नक्की वाचा- पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पत्नीकडून साफ करुन घेतला बेड; मध्य प्रदेशातील संतापजनक प्रकार)
गेल्या 12 दिवसांत भारतीय विमान कंपन्यांच्या 275 हून अधिक फ्लाइट्सना बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. यातील बहुतांश धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. गेल्या गुरुवारी 70 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. 21 ऑक्टोबर रोजी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं होतं की, विमानांमध्ये बॉम्बची धमकी देणाऱ्यांची नावे 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) या विषयावर गृह मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे.