Rajasthan News : राजस्थानच्या पश्चिमेकडील थार वाळवंटात एक ऐतिहासिक शोध घेण्यात आला आहे. या शोधात हडप्पा संस्कृतीचे (Harappan civilization) 4500 वर्ष जुने अवशेष मिळाल्याचा दावा केला जात आहे. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण पुरातत्व शोध करण्यात आला. या शोधामुळे इतिहासकार आणि शोधकर्त्यांना नवी दिशा मिळाली आहे.
हा शोध रातडिया री डेरी नावाच्या ठिकाणी झाला. हे ठिकाण रामगढ तालुक्यातून साधारण 60-70 किलोमीटर अंतरावर आहे आणि सादेवालहून १५-१७ किलोमीटर दूर उत्तर-पश्चिमेच्या दिशेला आहे. या ठिकाणाहून हडप्पा संस्कृतीचे साधारण 4500 वर्षे जुने अवशेष सापडले आहेत. ज्याला सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. या शोधामुळे राजस्थानातील थारपर्यंत सिंधू संस्कृतीचा विस्तार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा शोध राजस्थान विद्यापीठ आणि अन्य संस्थांच्या इतिहासकार आणि संशोधकांच्या टीमने एकत्रितपणे केला आहे. ज्यामध्ये दिलीप कुमार सैनी, पार्थ जगानी, चतर सिंग जाम, प्रा.जीवन सिंग खार्कवाल, डॉ. तमेघ पवार, डॉ. रवींद्र देवरा आणि प्रदीपकुमार गर्ग प्रमुख आहेत. या शोधाला प्राध्यापक जीवनसिंग खार्कवाल, डॉ. तमेघ पवार आणि डॉ. रवींद्र देवरा यांनी दुजोरा दिला आहे. डॉ. रवींद्र देवदा यांनी हा शोधनिबंध इंडियन जर्नल सायन्समध्ये प्रकाशनासाठी पाठवला आहे.
भारत-पाक सीमेवरील या भागात मोठ्या प्रमाणात मातीची भांडी, टेराकोटा वस्तू, बांगड्या, दगडी अवजारे आणि चेर्ट दगडापासून बनवलेले ब्लेड सापडले आहेत. विशेष म्हणजे येथे पाचराच्या आकाराच्या विटा देखील सापडल्या आहेत, ज्या गोलाकार भट्टी आणि भिंती बनवण्यासाठी वापरल्या जात होत्या. या ठिकाणीवर दक्षिण भागात एक प्राचीन भट्टीचा शोध घेण्यात आला आहे. ज्याची निर्माण शैली ही मोहनजोदाडो आणि गुजरातमधील कानमेरसारख्या ठिकाणी आढळलेल्या वस्तुंसारखी आहे, शोधाच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं आहे की, हडप्पा संस्कृती केवळ नदीच्या किनाऱ्यापर्यंत सीमित नाही.
रातडिया री डेरी हे ठिकाण केवळ पुरातत्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, तर राजस्थानच्या इतिहासात एक नवीन अध्याय देखील जोडला जात आहे. हडप्पा संस्कृतीचे प्रमाण, नवीन उपक्रम आणि सामाजिक रचना समजून घेण्यात हा शोध महत्त्वाची भूमिका बजावेल.