हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Heavy Rain) मान्सूनचा कहर पाहायला मिळत आहे. काल (31 जुलै) हिमाचल प्रदेशात तुफान पाऊस झाला. तीन ठिकाणी ढगफुटी झाल्याचं वृत्त आहे. यामुळे हिमाचलमधील कुल्लू, मंडी आणि शिमलामध्ये दाणादाण उडाली आहे. याचा परिणाम घरं, इमारती, शाळा आणि रुग्णालयांवर पाहायला मिळत आहे.
तीन ठिकाणी झालेल्या ढगफुटीत 40 जणं बेपत्ता झाल्याची माहिती आहे. मंडीमध्ये एकाचा मृतदेह सापडला आहे. हवामान विभागाने शुक्रवारपासून राज्यातील विविध ठिकाणांमध्ये अतिमुसळधार पावसासाठी बुधवारी यलो अलर्ट जारी केला होता. राज्यात 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
डोळ्यांदेखत भाजीमंडई वाहून गेली...
कुल्लूच्या मणिकरण भूंतर मार्गावरील शाट भाजीमंडईची इमारत पाण्यात वाहून गेली. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहील. ढगफुटीनंतर येथील परिस्थिती बिघडली आणि अख्खी इमारत कोसळल्याचं दिसत आहे.
मंडीमध्ये ढगफुटी झाल्यामुळे परिस्थिती बिघडली आहे. येथे 11 जणं वाहून गेले आहेत. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने तुफान पावसाचा इशारा दिला आहे.
कुल्लूच्या निरमंडमध्ये ढगफुटीनंतर बागी पुलाजवळ गाड्या-घर वाहून गेली आहेत. चंडीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे शिमल्यातील रामपुरमध्ये ढगफुटीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात 20-25 जणं बेपत्ता झाल्याची शक्यता आहे.