Homosexual Relations: 21 व्या शतकात नातं हे स्त्री-पुरुष संबंधाच्या पुढे गेलं आहे. गेल्या काही वर्षात समलैंगिक संबंधात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. तसं पाहता समाजात ही नाती आधीपण अस्तित्वात होती. मात्र आता लोक मोकळेपणाने यावर बोलत आहेत. अमेरिकेच्या एका रिपोर्टमधून याचा खुलासा झाला आहे. एका अभ्यासानुसार, 1990 नंतर बायसेक्शुअल नात्यांत तिप्पटीने वाढ झाली आहे. अमेरिकेनंतर भारताबद्दल बोलायचं झालं तर येथील परिस्थिती वेगळी नाही. वेगवेगळ्या अहवालात भारतातील समलैंगिकांची संख्या 5 ते 20 कोटींदरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे.
द जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेत पूर्वी बायसेक्शुअलची संख्या 3.1 टक्के होती, हा आकडा सध्या 9.3 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी सांगितलं की, 9 टक्के हा आकडा फार धक्कादायक नाही. असं होणारच होतं. कारण जागरूकतेमुळे लोक सत्य न लपवता ते खुलेपणाने मान्य करीत आहेत. आधीच या नात्यात असलेले मात्र कधीच समाजासमोर मान्य न केलेले लोक यावर मोकळेपणाने बोलत आहेत. यावर अद्याप कायदेशीर वाद सुरूच आहे. मात्र आपला समाजही यांचा स्वीकार करीत आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप वोहरा यांनी सांगितलं की, समलैंगिकतेबद्दल सांगायचं झालं तर हा कोणत्याही आजाराचा प्रकार नाही. त्यामुळे यावर काही उपचारही नाही. काही जणं सुरुवातीपासून एखाद्या लिंगाकडे (Gender) आकर्षित होतात. त्यावर कोणतेही उपचार करत नाही. मात्र कधी कधी कुटुंबीयाला या गोष्टी आवडत नाहीत आणि पटतही नाहीत. अशावेळी कौटुंबिक समुपदेशन करावं लागतं.