नोकरी आणि कामाचा व्याप सांभाळता येत नसल्याच्या तणावातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने टोकाचं पाऊल उचललं आहे. हैदराबादमधील मियापूर परिसरात बुधवारी या 31 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एका नामांकित कंपनीत कामाला असूनही कामाच्या दबावामुळे त्याने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कामाचा ताण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कोडिंगचं काम जमत नसल्याने टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, या इंजिनिअरने अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोडिंगशी संबंधित काम देण्यात आले होते. मात्र, हे काम त्याला अत्यंत कठीण जात होतं. कामाच्या गरजा आपण पूर्ण करू शकणार नाही, अशी भीती त्याच्या मनात बसली होती. याच नैराश्यातून त्याने बुधवारी सकाळी आपल्या घरी आत्महत्या केली.
(नक्की वाचा- Pune-Mumbai Expressway वरील टँकर हटवला मात्र कोंडी कायम; नव्या अडचणीमुळे पोलीसही हतबल)
वर्षभरापूर्वीच झालेलं लग्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. कामात येणाऱ्या अडचणींबद्दल त्याने आपली पत्नी आणि भावाला आधीच सांगितले होते. तो वारंवार आपल्या पत्नीशी फोनवर बोलून मनातील भीती व्यक्त करायचा. त्याची पत्नी जानेवारीत आंध्र प्रदेशातील आपल्या माहेरी गेली होती. ती अद्याप हैदराबादला परतली नव्हती, त्यापूर्वीच पतीने हे टोकाचं पाऊल उचललं.
(नक्की वाचा- Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)
सध्याच्या काळात आयटी कंपन्यांमध्ये कामाचे तास जास्त असण्यावरून मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, या इंजिनिअरच्या बाबतीत कामाच्या तासांपेक्षा कामाचे स्वरूप कठीण असणे, हे आत्महत्येचे मुख्य कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आपल्याला कोडिंग जमणार नाही आणि नोकरीत टिकणं कठीण होईल, या एकाच विचारामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |