जाहिरात

DMK-Congress: पाठीत खंजीर खुपसला! काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी डीएमके सज्ज; दिल्लीत 'इंडिया' आघाडीची शकलं?

DMK Breaks Ties with Congress: तमिळनाडूच्या राजकारणातील भूकंपानंतर आता त्याचे धक्के थेट दिल्लीत पोहोचले आहेत.

DMK-Congress: पाठीत खंजीर खुपसला! काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी डीएमके सज्ज; दिल्लीत 'इंडिया' आघाडीची शकलं?
DMK Breaks Ties with Congress: डीएमकेने थेट लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.
मुंबई:

DMK Breaks Ties with Congress: तमिळनाडूच्या राजकारणातील भूकंपानंतर आता त्याचे धक्के थेट दिल्लीत पोहोचले असून 'इंडिया' (INDIA) आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेली काही वर्ष सोबत असणाऱ्या काँग्रेसने तमिळनाडूमध्ये सत्तेसाठी चक्क अभिनेता विजयच्या टीव्हीके (TVK) पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या डीएमकेने (DMK) आता काँग्रेसशी असलेले सर्व संबंध अधिकृतपणे तोडले आहेत. संसदेत आता आम्ही काँग्रेसच्या शेजारी बसणार नाही, अशी आग्रही भूमिका घेत डीएमकेने थेट लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संसदेतील बैठक व्यवस्था बदलण्याची मागणी

डीएमकेच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कनिमोळी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहून संसदेतील पक्षाच्या सदस्यांची बैठक व्यवस्था बदलण्याची विनंती केली आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आता आमची काँग्रेससोबतची युती संपली आहे, त्यामुळे त्यांच्या शेजारी बसणे योग्य ठरणार नाही, असे कनिमोळी यांनी स्पष्टपणे पत्रात म्हटले आहे. लोकसभेत डीएमकेचे 22 खासदार असून, संसदेतील हा चौथा मोठा गट आता काँग्रेसपासून वेगळा होऊन स्वतंत्र बाकावर बसणार आहे.

( नक्की वाचा : Kerala CM: केरळचा मुख्यमंत्री ठरला! दिल्लीतील खलबतं संपली, 'या' बड्या नेत्यावर हायकमांडचं शिक्कामोर्तब? )

काँग्रेसवर 'बॅकस्टॅबर' म्हणून टीका

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमकेसोबत राहूनही काँग्रेसने ऐनवेळी सत्ता स्थापनेसाठी अभिनेता विजयच्या पक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे डीएमकेमध्ये प्रचंड संताप आहे. डीएमकेच्या नेत्यांनी उघडपणे बोलताना काँग्रेसला 'बॅकस्टॅबर' म्हणजेच पाठीत खंजीर खुपसणारा मित्र म्हटले आहे. 

डीएमकेचे प्रवक्ते सरवणन अण्णादुराई यांनी तर असा दावा केला आहे की, काँग्रेसने तमिळनाडूमध्ये ज्या 5 जागा जिंकल्या आहेत, त्या केवळ डीएमकेच्या नेतृत्वाखालील युतीमुळेच शक्य झाल्या आहेत, अन्यथा त्यांना भोपळाही फोडता आला नसता.

( नक्की वाचा : Tamil Nadu Election 2026 महिलांना सोनं ते तरुणांना पगार; Thalapathy Vijay यांनी कशी जिंकली तामिळनाडू निवडणूक? )

इंडिया आघाडीत मोठी फूट

या घडामोडींमुळे केवळ तमिळनाडूमध्येच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात तयार झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढवणाऱ्या समाजवादी पक्षानेही या वादात उडी घेतली आहे. अखिलेश यादव यांनी एमके स्टालिन आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

 संकटाच्या काळात आम्ही लोकांना सोडून जात नाही, असे म्हणत अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली आहे. यामुळे आघाडीतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

विजयाची साथ आणि काँग्रेसची भूमिका

तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकल्या आहेत, तर बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. डीएमकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने या नवीन पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तमिळनाडूच्या जनतेचा कौल पाळण्यासाठी हा जबाबदार निर्णय असल्याचे समर्थन काँग्रेसकडून केले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे गेल्या 2016 पासून एकत्र असणारी काँग्रेस-डीएमके युती आता पूर्णपणे मोडली असून, विरोधकांच्या राष्ट्रीय एकजुटीला मोठा तडा गेला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com