इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत एसआयआर आणि मतचोरी विरुद्ध मोर्चा काढला आहे. मोर्चादरम्यान खासदारांना दिल्ली पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. त्यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव बॅरिकेडवर चढले आणि त्यावरुन उडी मारली. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते या विरोधी मोर्चात सहभागी आहेत.
यावेळी इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाच्या दिशेने जात होते. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड लावले. या दरम्यान अखिलेश यादव बॅरिकेडवर चढले आणि ते ओलांडण्याचा प्रयत्न केला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
आंदोलनात कोण सहभागी झाले?
या मोर्चात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी आहेत. खासदारांनी पांढऱ्या टोप्या घातल्या आहेत. ज्यावर 'एसआयआर' आणि 'मतांची चोरी' असं लिहिलेलं आहे. त्यांच्यावर रेड क्रॉसचे चिन्ह देखील आहे. मोर्चा सुरू होण्यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या निदर्शनासाठी कोणीही परवानगी मागितली नव्हती.