Petrol-Diesel Price Hikes: पेट्रोल-डिझेलच्या किमती काही दिवसात आणखी वाढणार? काय आहे कारण?

Fuel Price Hike News: भारतात डिझेल आणि पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या ११ दिवसांत इंधनाचे दर प्रति लीटर तब्बल ७ रुपयांपेक्षा जास्त वाढले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

सर्वसामान्यांचे बजेट आधीच भाजीपाला, खाद्यतेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे कोलमडले आहे. अशातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक मोठा कात्री लागण्याची शक्यता वित्तीय बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी एका मोठ्या दरवाढीची टांगती तलवार आहे.

10 दिवसांत 4 वेळा दरवाढ 

सोमवारी देशात इंधनाच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली. गेल्या 10 दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. या 10 दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती टप्प्याटप्प्याने 3 रुपये, 90 पैसे, 87 पैसे आणि 2.61 रुपये असे एकूण 7.38 रुपये प्रति लीटरने वाढवण्यात आल्या आहेत.

Advertisement

दरवाढ होऊनही 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन' (IOC), 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (BPCL) आणि 'हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (HPCL) या तीन सरकारी तेल विपणन कंपन्या (OMCs) अजूनही मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करत आहेत.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

काय आहे इंधन दराचे गणित?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, तेल कंपन्यांचा जुना तोटा भरून काढण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात किंमत व किरकोळ विक्री किंमत यातील फरक मिटवण्यासाठी, इंधनाचे दर वास्तविक पाहता आणखी 28 ते 33 रुपयांनी वाढवणे गरजेचे आहे. म्हणजेच, अलीकडील दरवाढीनंतरही कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी किमान 20 रुपये प्रति लीटर आणखी वाढीची आवश्यकता आहे. एवढी मोठी दरवाढ राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एकाच वेळी करणे शक्य नसले, तरी येत्या काळात टप्प्याटप्प्याने दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इराण संघर्ष आणि निवडणुकांमुळे वाढला बोजा

28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या इराण संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढत असतानाही, भारतातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तब्बल 74 दिवसांपर्यंत देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते.

(नक्की वाचा-  Fuel Price Hike Today: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; चेक करा नवीन दर)

1.2 लाख कोटींचा फटका

कंपन्या महागडे कच्चे तेल आयात करत होत्या आणि जुन्याच दराने देशात विकत होत्या. परिणामी, जेव्हा पहिली दरवाढ जाहीर झाली, तोपर्यंत या तीन सरकारी कंपन्यांचा एकूण तोटा 1.2 लाख कोटी रुपयांच्या पार गेला होता. भारत आपल्या एकूण गरजेच्या तब्बल 88 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक पातळीवरील कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम भारताच्या आयातीवर आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर होतो. कंपन्यांना ऐन तेजीच्या काळात दररोज तब्बल 1600 कोटी रुपयांचा सामूहिक तोटा सहन करावा लागत होता.

Advertisement

ग्राहकांना तात्पुरता दिलासा, पण चिंता कायम

इंधनाचे दर प्रत्येक 50 पैशांनी वाढल्यास तेल कंपन्यांच्या नफ्यात 7 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढ होते. यामुळेच या दरवाढीमुळे कंपन्यांचा दैनंदिन तोटा काहीसा कमी झाला आहे, पण तो पूर्णपणे संपलेला नाही.

दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे अमेरिकेशी असलेल्या इराणच्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याच्या आशेने सोमवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी घसरल्या आहेत. 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' या जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल पुरवठा मार्गावरील तणाव कमी झाल्यास कच्च्या तेलाचे दर स्थिर होतील. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठा साखळी पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार असल्याने, तोपर्यंत इंधन दरवाढीचे संकट भारतीय ग्राहकांवर कायम राहण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article