भारतीय रेल्वेने (Indian Railways) ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या स्वच्छतेच्या आणि सोयीच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता रेल्वेच्या बेडरोलमध्ये (Bedroll) बेडशीट, पिलो कव्हर आणि टॉवेलसोबतच प्रवाशांना एक नवी गोष्ट मिळणार आहे, ती म्हणजे 'ब्लँकेट कव्हर' (Blanket Cover).
रेल्वेमध्ये मिळणार ब्लँकेट कव्हर
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रवाशांची नेहमी तक्रार असायची की, त्यांना चादर आणि उशीचे कव्हर (Pillow Cover) नवीन मिळते, पण अनेकदा ब्लँकेट मात्र दुसऱ्या प्रवाशाने वापरलेलेच ओढावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने आता उशीच्या कव्हरप्रमाणेच ब्लँकेटचाही नवीन कव्हर देण्याचा निर्णय घेतला आहे.
Railway Ticket Booking: पोस्ट ऑफिसमधून बूक करता येणार तिकिट; महाराष्ट्रात कुठे-कुठे सुविध उपलब्ध
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी जयपूरच्या खातीपुरा रेल्वे स्टेशनवर या नवीन सुविधेची सुरुवात केली. सध्या ही सेवा पायलट प्रोजेक्ट (Pilot Project) म्हणून जयपूर-अहमदाबाद (असारवा) एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरू करण्यात आली आहे. या पायलट प्रोजेक्टच्या पहिल्याच दिवशी, रात्री ८:४५ वाजता जयपूरहून सुटणाऱ्या जयपूर-अहमदाबाद (असारवा) एक्सप्रेसच्या वातानुकूलित (AC) कोचमधील प्रवाशांना पारंपरिक सांगानेरी प्रिंटचे (Sanganeri Print) असलेले नवीन कंबल कव्हर पॅकेटमध्ये देण्यात आले. स्वच्छतेबद्दल प्रवाशांच्या मनात असलेला संशय दूर करण्यासाठी रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वेमंत्र्यांची घोषणा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ब्लँकेटचा वापर रेल्वे सिस्टीममध्ये अनेक वर्षांपासून होत आहे, पण प्रवाशांच्या मनात नेहमी संशय (Doubt) असायचा. तो संशय दूर करण्यासाठी ही नवी सुविधा सुरू झाली आहे. जयपूरहून धावणाऱ्या एका गाडीतून याची पायलट बेसिसवर सुरुवात झाली आहे आणि या प्रोजेक्टचे निष्कर्ष तपासल्यानंतर इतर ट्रेन्समध्येही ही सुविधा पुढे वाढवण्यात येईल.
Viral VIDEO: टॉयलेटमधून निघाल्या दारूच्या बाटल्या, बघता बघता बाटल्यांचा खच, पाहा VIDEO
इतर सुविधांचा विस्तार: यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर पश्चिम रेल्वेअंतर्गत ६५ लहान आणि मध्यम स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे अपग्रेडेशन, विस्तार आणि एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली (Integrated Passenger Information System) यांचे लोकार्पणही केले. राजस्थानमधील सुमारे ६५ स्टेशनवर प्लॅटफॉर्मची उंची, लांबी आणि कव्हर वाढवण्यासह प्रवाशांना माहिती देण्यासाठी साइन बोर्ड लावण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.