India Railway Ticket New Rule: प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे एका मोठ्या बदलाची तयारी करत आहे. आता कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख बदलल्यास कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत. याचा अर्थ असा की, जर तुमच्याकडे 20 नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला जाण्याचे कन्फर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुमचा बेत 5 दिवसांनी पुढे ढकलला, तर तुम्हाला 25 नोव्हेंबर साठी नवीन तिकीट काढण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या 20 नोव्हेंबर च्या कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख ऑनलाइन बदलू शकाल आणि त्याच तिकिटावर 25 नोव्हेंबर रोजी पुण्याला प्रवास करू शकाल.
सध्याच्या व्यवस्थेनुसार, प्रवासाचा बेत बदलल्यास तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करावे लागते. त्यानंतर पुढील तारखेसाठी नव्याने तिकीट बुक करावे लागते. यामध्ये तिकीट रद्द करण्याचे पैसे कापले जातात. तसेच, पुढील तारखेला कन्फर्म तिकीट मिळेलच याचीही खात्री नसते.
( नक्की वाचा : Mumbai Metro 3 Aqua Line: मुंबई मेट्रो 3 चा अंतिम टप्पा उद्घाटनासाठी सज्ज; वाचा संपूर्ण मार्ग आणि तिकीट दर )
काय होणार बदल?
रेल्वे कन्फर्म तिकिटाच्या पुनर्नियोजन (re-scheduling) संदर्भात एक मोठा बदल करणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मोठ्या बदलांविषयी NDTV ला माहिती दिली आहे. त्यानुसार, कन्फर्म रेल्वे तिकिटाच्या प्रवासाची तारीख ऑनलाइन बदलल्यास पैसे कापले जाणार नाहीत. सध्याच्या व्यवस्थेत प्रवासाची तारीख बदलण्याची सोय उपलब्ध नाही.
सध्या, तिकीट रद्द करून प्रवासाची तारीख बदलावी लागते. यात खूप पैसे कापले जातात. म्हणजेच, प्रवास न करताही प्रवाशांच्या खिशावर बोजा पडतो. रेल्वेमंत्र्यांनी मान्य केले की ही व्यवस्था योग्य नाही आणि प्रवाशांच्या हिताची नाही. यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत आणि बदल केले जात आहेत. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, जानेवारी पासून ऑनलाइन तिकिटाच्या प्रवासाची तारीख बदलता येईल.
कन्फर्म तिकीट मिळणार का?
पण, यामध्ये कन्फर्म तिकिटाऐवजी कन्फर्म तिकीट मिळेलच याची हमी (Guarantee) असणार नाही, यात उपलब्धतेनुसार तिकीट मिळेल. तसेच, भाड्यामध्ये काही फरक असल्यास तो प्रवाशाला भरावा लागेल. या बदलामुळे त्या लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे.