Indian Railways: केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. देशभरातील सुमारे 11.5 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी यंदा 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा फायदा ग्रुप C आणि ग्रुप D मधील कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, टेक्निशियन, पॉइंट्समन आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा बोनस 'प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस' (PLB) म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिला जातो.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि लगेच समस्या सोडवा )
कधी जमा होणार रक्कम?
हा बोनस थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल आणि त्याचे वितरण लवकरच सुरू होईल. सणासुदीच्या काळात हा बोनस मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्थव्यवस्थेला चालना
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल अशी आशा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात असा बोनस जाहीर केल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. बोनसची रक्कम बाजारात आल्याने खरेदी-विक्री वाढते, ज्यामुळे व्यापार आणि उद्योगांनाही चालना मिळते. तसेच, अलीकडेच जीएसटी दरात केलेल्या बदलांमुळेही बाजारात वेग येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.