- कॅलिफोर्नियामध्ये 37 वर्षीय भारतीय चिरंजीवी कोल्ला यांचा व्हॅली फिव्हर दुर्मीळ बुरशीजन्य संसर्गामुळे मृत्यू
- व्हॅली फिव्हर हा संसर्ग कोक्सिडियोइड्स या बुरशीमुळे होतो
- चिरंजीवी कोल्ला यांना सुरुवातीला सामान्य फ्लूचे लक्षणे आढळली, पण नंतर त्यांचा फुफ्फुस गंभीरपणे प्रभावित झाली
Valley Fever News: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय भारतीयाचा मृत्यू झाला आहे. चिरंजीवी कोल्ला असे मृत तरुणाचे नाव आहे, त्यांना ‘व्हॅली फिव्हर' (Valley Fever) या दुर्मीळ बुरशीजन्य संसर्गाची (फंगल इन्फेक्शन) लागण झाली होती. या संसर्गामुळे त्यांच्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान झाले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चिरंजीवी कोल्ला सुमारे महिनाभर आयसीयूमध्ये दाखल होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाला मदत करण्यासाठी नातेवाईकांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
चिरंजीवी कोल्ला यांचे चुलत भाऊ रामा कोटेश्वर राव यांनी निधी गोळा करण्यासाठी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी माहिती दिली की, ही मोहीम कोल्ला यांची पत्नी पवनी मारेला आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाच्या (विहान) मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे. कोल्ला हे शांत स्वभावाचे, कुटुंबासाठी समर्पित, सहकारी तसेच मित्र नातेवाईकांमध्ये अतिशय प्रिय व्यक्तिमत्त्व असल्याचेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सर्वांचे लाडके होते चिरंजीवी कोल्ला
चुलत भावाने पोस्टमध्ये लिहिलंय की,"ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी कधीही मोठ्या आवाजात संभाषण केले नाही, कधीही शॉर्टकट स्वीकारला नाही आणि कोणालाही कमी लेखले नाही." कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्यामध्ये सामान्य फ्लू आणि खोकला अशी लक्षणे आढळली. हळूहळू त्यांची प्रकृती बिघडत गेली, यानंतर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये औषधोपचार सुरू करण्यात आले. यावेळेस डॉक्टरांना सुरुवातीला गंभीर न्यूमोनिया झाल्याचा संशय होता.
(नक्की वाचा: Benefits of Sleeping Early: 60 दिवस मी रात्री लवकर झोपलो, थकवा गायब आणि शरीरात झाले मोठे बदल!थक्क करणारा अनुभव)
पण वैद्यकीय तपासणीत त्यांना 'व्हॅली फिव्हर' नावाचा बुरशीजन्य संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. हा संसर्ग कॅलिफोर्निया आणि अमेरिकेच्या नैऋत्य भागातील मातीत आढळणाऱ्या कोक्सिडियोइड्स (Coccidioides) बुरशीमुळे होतो. या संसर्गाचा त्यांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुमारे 30 दिवस उपचार आणि कृत्रिम श्वासोच्छवासावर राहिल्यानंतर 5 मे रोजी त्यांचे निधन झाले.
कोल्ला कुटुंबासाठी मदत निधी
चिरंजीवी कोल्ला यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये संपूर्ण वेळ त्यांच्यासोबत होती, त्याच वेळी ती आपल्या लहान मुलालाही सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. तो मुलगा वारंवार विचारायचा की, "बाबा घरी कधी येणार?" कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, चिरंजीवी कोल्ला हे घरातील एकमेव कमावते सदस्य होते. या फंडरेजरच्या माध्यमातून हॉस्पिटलचा खर्च, अमेरिका आणि भारतातील अंत्यसंस्कार, दैनंदिन खर्च, मुलाचा सांभाळ आणि त्याच्या भविष्यातील शिक्षणासाठी मदत गोळा केली जात आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार चिरंजीवी कोल्ला हेल्थकेअर टेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्यरत होते आणि सॅन फ्रान्सिस्को बे परिसरात वास्तव्यास होते.
(नक्की वाचा: Super El Nino 2026: सुपर अल निनो म्हणजे काय? महाराष्ट्रासाठी मे ते जुलै महिन्यापर्यंत धोक्याचा काळ, भीषण संकट येणार?)
व्हॅली फिव्हर म्हणजे काय?| What Is Valley Fever? | Valley Fever Meaningव्हॅली फिव्हर ज्याला वैद्यकीय भाषेत कोक्सिडियोइडोमायकोसिस (Coccidioidomycosis) म्हटले जाते, हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. हा आजार कोक्सिडियोइड्स (Coccidioides) नावाच्या बुरशीचे सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे होतो. ही बुरशी सहसा कॅलिफोर्निया, ॲरिझोना आणि अमेरिकेच्या नैऋत्य भागातील कोरड्या मातीत आढळते. बहुतेक लोकांमध्ये या संसर्गामुळे सौम्य फ्लूसारखी लक्षणे दिसतात किंवा काही प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण काही प्रकरणांमध्ये विशेषतः जेव्हा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पसरतो तेव्हा तो गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो.
प्रमुख लक्षणे:
- खोकला
- ताप
- छातीत दुखणे
- थकवा
- श्वास घेण्यास त्रास होणे
Photo Credit: NDTV Marathi
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गंभीर प्रकरणांची संख्या कमी असते, पण ज्यांच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती (इम्यून सिस्टम) कमकुवत असते किंवा ज्यांना आधीच काही आजार आहेत, त्यांच्यामध्ये प्रकृतीशी संबंधित गुंतागुंत वाढण्याचा धोका जास्त असतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)