दोन्ही हात नसलेल्या दिव्यांग क्रिकेटपटू आमिर लोन याच्या जिद्दीचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी कौतुक केले होते. दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक बनलेल्या आमिरने एक स्वप्न पाहिले होते. जम्मू कश्मीरमध्ये एक उत्तम दर्जाची क्रिकेट अकॅडेमी असावी, तिथून बाहेर निघणारे क्रिकेटपटू रणजीसह देशांतर्गत स्पर्धांमध्ये चमकावेत आणि त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व करावे, हे स्वप्न आमिरने पाहिले होते. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहराच्या वाघामाचा रहिवासी असलेला आमिर हा भारताच्या पॅरा क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. आमिरने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अदाणी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमिरने जम्मू कश्मीरमधील क्रिकेट अकॅडेमीमध्ये गरीब घरातील प्रतिभावंत मुलांना हेरून त्यांना प्रशिक्षित करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. यासाठी तो इनडोअर क्रिकेट अकॅडेमीसाठी धडपड करत होता. गरीब घरातील मुलं प्रतिभावंत असतात, मात्र त्यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी पैसे नसल्याने ते क्रिकेट खेळू शकत नाही आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शनही मिळू शकत नाही. आमिरला या मुलांसाठी सुरू करायच्या असलेल्या क्रिकेट अकॅडेमीसाठी मोठी रक्कम उभी करावी लागणार होती. इतकी मोठी रक्कम कुठून आणणार या विनंचनेत असलेल्या आमिरला अदाणी फाऊंडेशनने पाठबळ दिले. अदाणी फाऊंडेशनने या अकॅडेमीसाठी 67 लाख 60 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
नक्की वाचा : Reliance Jio Vs BSNL : जिओला झटका, दीड कोटींहून अधिक ग्राहकांनी ठोकला रामराम
आर्थिक मदतीची घोषणा होताच आमिर तातडीने कामाला लागला आहे. त्याने क्रिकेट अकॅडेमी कशी असावी याचा एक आराखडा तयार केला आहे. अकॅडेमीसाठीची बिल्डींग कशी असावी याचाही आराखडा त्याने तयार केला आहे. या अकॅडेमीमध्ये बिजबेहारा, कॅटरीटेंग, वाघामा, संगम, परहामा, दादू, ताकीबल, कांडीपोरा, खिरम, सिरहामा, शालिगाम, पंचपोरा, अनंतनाग, पुलमावा, शोपिया आणि अन्य जिल्ह्यातील मुलांना क्रिकेटचे धडे शिकवण्यात येणार आहेत.
नक्की वाचा :अदाणी समूह बिहारमध्ये आणखी 2300 कोटींची गुंतवणूक करणार
या क्रिकेट अकॅडेमीमध्ये तीन शिफ्टमध्ये क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहे. इथे नाईट शिफ्टही असणार आहे. या क्रिकेट अकॅडेमीतून 100 प्रतिभावंत क्रिकेटपटूंची रणजी स्पर्धा, अंडर-16,अंडर-19 या स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार असून आहे. जम्मू कश्मीरमधली मुले ही अत्यंत प्रतिभावंत असून ती उत्तम फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज होऊ शकतात. त्यांच्यातील गुण हेरून त्यांना प्रशिक्षित करून संधी दिली तर ते उत्तम कामगिरी करू शकतील असा विश्वास आमिरने व्यक्त केला आहे.