Indore News : इंदूरच्या नंदलालपुरा भागातील किन्नरांमधील वादातून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. या वादातून तब्बल 24 किन्नरांनी विष प्यायलं आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेसह पोलिसांच्या गाडीतून किन्नरांना रुग्णालयात पोहोचवलं. प्राथमिक तपासात किन्नरांनी फिनाइल प्यायल्याचं समोर आलं आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
पोलिसांकडून तपास सुरू
सर्व किन्नरांवर एमवाय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सीएमएचओच्या सूचनेनुसार, सर्व किन्नरांवर योग्य ते उपचार केले जात आहे. विषारी पदार्थ पिण्यामागील कारण नेमकं स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्टवर
पंढरीनाथ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या या घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्टवर आहे. कलेक्टर शिवम वर्माकडून प्रत्येक क्षणाची माहिती घेतली जात आहे. एमवाय रुग्णालयात किन्नरांवर योग्य पद्धतीने उपचार केला जात आहे. यावेळी एसडीएम प्रदीप सोनी आणि तहसीलदारदेखील उपस्थित होते.
डीसीपी आनंद कलादगी यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि एकूण २४ किन्नरांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले. सर्वांवर उपचार सुरू असून स्थिती नियंत्रणात आहे.