Success Story: भारतीय लष्कराच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA), चेन्नईचे मैदान त्या दिवशी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. जेव्हा एसएससी 120 आणि एसएससी वूमन-34 बॅचची पासिंग आउट परेड झाली. तेव्हा कॅडेट्सनी दमदार मार्च केला. त्यांनी पहिल्यांदाच खांद्यावर स्टार्स लावून देशसेवेची शपथ घेतली. नेमका तोच क्षण होता, जेव्हा सगळ्यांच्या नजरा चेन्नईच्या वरप्रसादवर खिळल्या होत्या. एका अशा तरुणावर, ज्याने गरिबीवर मात करून एक नवा इतिहास रचला. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतूक होत आहे.
नक्की वाचा - Kalyan News: रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस, फ्राईड राईसमध्ये आता आढळले...
संघर्षातून मिळालेले यश
वरप्रसाद हा अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण आहे. त्याचे वडील रोजंदारीवर मजूरीचं काम करत होते. अशा कुटुंबात तो वाढला आणि शिकला. परिस्थिती इतकी कठीण होती की त्याला 10 वी नंतर शिक्षण सोडावे लागले होते. पण त्याने हार मानली नाही. एक वर्षानंतर त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. त्याने पार्ट-टाइम काम करून अभ्यास केला. ऐवढचं नाही तर शाळेत टॉपर बनून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
IIM ची सुवर्ण संधी नाकारली
लोयोला कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स केल्यानंतर वरप्रसादने UGC NET-JRF परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला IIM मधून फुल फंडेड पीएचडीची ऑफर देखील मिळाली होती. परंतु वरप्रसादचे स्वप्न काहीतरी वेगळेच होते. त्याच्या डोळ्यात ऑलिव्ह ग्रीन वर्दी घालून मातृभूमीची सेवा करण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने करिअरची एक सुवर्ण संधी नाकारून सैन्याचा मार्ग निवडला. शिवाय तो त्याने प्रत्यक्षातही आणला.
पासिंग आउट परेडचा गौरव
जेव्हा OTA चेन्नईच्या परेड ग्राउंडवर वरप्रसाद लेफ्टनंट म्हणून मार्च करत होता, तेव्हा त्याच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले होते. त्यांचे उर अभिमानाने भरून आले होते. त्याचा हा संघर्ष केवळ परेड ग्राउंडपर्यंतच मर्यादित राहिला नाही, तर हजारो तरुणांच्या हृदयापर्यंत पोहोचला. प्रशिक्षण कमांडने त्याला 'विद्वान योद्धा' म्हणून सन्मानित केले. कारण त्याने शिक्षण आणि पराक्रम या दोन्हीमध्ये एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
वरप्रसादच लक्ष्य
राजपूत रेजिमेंटमध्ये सामील होऊन वरप्रसादने त्या परंपरेलाही सलाम केला. जिथून शहीद मेजर मुकुंद वरदराजन यांनी सेवा केली होती. त्याचा हा प्रवास हे सांगतो की स्वप्नं पूर्ण करण्यासाठी परिस्थिती नाही, तर धैर्य महत्त्वाचे असते. वरदप्रसादचा हा संघर्ष खरोखर प्रेरणादायी म्हणावा लागेल. त्याने ठरवलं असतं तर तो गडगंड पगाराची नोकरी करू शकला असता. पण त्याने ते न करता देश सेवेला प्राधान्य दिलं. शिवाय तो आता आपल्या कुटुंबाची परिस्थितीही सुधारू शकणार आहे.