- अभिजीत पाटील हे राजस्थान केडरमधील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी आहेत
- त्यांनी कोणत्याही महागड्या कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली
- अभिजीत यांनी बी.टेक सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग करत असताना यूपीएससीची तयारी सुरू केली होती
IPS Abhijeet Patil Success Story: कपाळावर अशोक स्तंभ, खांद्यावर चमकणारे तारे आणि अंगात खाकी वर्दी. दिसायला मात्र एखाद्या महाविद्यालयीन तरुणासारखा. राजस्थान केडरमधील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी म्हणून अभिजीत पाटील सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. जेनरेशन झेड (Gen Z) मधील या अधिकाऱ्याने कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासशिवाय पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करून नवा आदर्श निर्माण केला आहे.
ठाणे येथे 11 जून 1999 रोजी अभिजत पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे बी.टेक. (सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग) पूर्ण करतानाच यूपीएससीची तयारी सुरू केली होती. विशेष म्हणजे, पदवी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती. 2022 च्या परीक्षेत त्यांनी देशात 470 वी रँक मिळवून आयपीएस पद प्राप्त केले. ते देशातील सध्याच्या घडीला सर्वात तरूण आयपीएस अधिकारी ठरले आहेत. त्यामुळेच त्यांची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
कमी वयातील मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. अभिजीत पाटील हे देशातील चौथ्या-पाचव्या सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या 'बेबी फेस'मुळे अनेकदा लोक गोंधळात पडतात. मात्र आपल्या कामातून आणि आत्मविश्वासाने त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांचे वडील बृहन्मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखापरीक्षक होते, तर आई सिंचन विभागात कार्यरत होती. सध्या ते दोघे ही निवृत्त झाले आहेत. ते ठाण्यालाच राहतात.
अभिजीत यांचे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील आहे. ते ठाण्याचे मुळ रहीवाशी आहे. त्यांना दोन बहिणीं आहेत. ते एकुलते एक धाकटे भाऊ आहेत. अभिजीत यांनी पदवीच्या शेवटच्या वर्षात असतानाच युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. आज 2026 मध्ये त्यांचं वय 26 वर्षे आहे. पण त्यांची जिद्द पाहून अनुभवाने मोठ्या असलेल्यांनाही अभिमान वाटत आहे. ते वयाच्या 22 व्या वर्षीच आयपीएस झाले होते.