अमेरिका आणि इराण दरम्यान भडकलेल्या युद्धाची मोठी झळ आता भारताला बसली आहे. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अमेरिकन सैन्याने केलेल्या एका आक्रमक लष्करी हल्ल्यात 'एमटी सेतेबेलो' (MT Settebello) या मालवाहू तेलवाहू जहाजावरील 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही हल्ल्यानंतर बेपत्ता झाले होते, मात्र आता त्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत या अत्यंत वेदनादायी घटनेची माहिती दिली आहे.
24 भारतीय खलाशांसह 28 जणांचे क्रू मेंबर्स
पलाऊ देशाचा ध्वज असलेल्या 'एमटी सेतेबेलो' या ऑइल टँकरवर एकूण 28 कर्मचारी तैनात होते. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 24 भारतीय खलाशांचा समावेश होता. याशिवाय 2 पाकिस्तानी, 1 युक्रेनियन आणि 1 रशियन नागरिक जहाजावर होते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या सैन्याने या जहाजावर 'प्रिसिजन म्युनिशन' म्हणजेच अचूक मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यातून 21 भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले, परंतु 3 जण बेपत्ता झाले होते.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
मृत पावलेल्या भारतीय खलाशांची नावे
- आदित्य शर्मा (डेक कॅडेट)
- शिवानंद चौरसिया (इंजिन फिटर)
- पटनाला सुरेश (चीफ इंजिनिअर)
अमेरिकेने हल्ला का केला?
अमेरिकन लष्कराने या कारवाईचे समर्थन करताना म्हटले आहे की, हे जहाज इराणवरील आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध आणि नाकेबंदी झुगारून तिथून कच्च्या तेलाची वाहतूक करत होते. अमेरिकन नौदलाने दिलेल्या सूचनांचे आणि इशाऱ्यांचे पालन करण्यास या जहाजाने नकार दिल्यामुळेच 'आत्मरक्षार्थ आणि प्रतिबंधात्मक कारवाई' म्हणून या ऑइल टँकरवर थेट क्षेपणास्त्र डागण्यात आले.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)
सध्या या जहाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला विस्कळीत नेटवर्कमुळे इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील या हिंसक हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, युद्धाच्या या भडक्यात निष्पाप भारतीय खलाशांना जीव गमवावा लागल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे.