देशभरातील सगळ्या करदात्यांना त्यांचे आयकर विवरण सादर करणे गरजेचे असून, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत जाहीर करण्यात आली होती. ही मुदत वाढणार का ? असा प्रश्न करदात्यांना पडला होता. सोशल मीडियावर या अनुषंगाने काही मेसेज व्हायरल झाले असून यामुळे करदात्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. हा गोंधळ आयकर विभागानेच दूर केला आहे.
नक्की वाचा: ITR Filing Last Date: रिटर्न भरले की नाही ? कधीपर्यंत आहे डेडलाइन ? जाणून घ्या सगळ्या डिटेल्स
ITR Filing साठी खरंच मुदत मिळालीय का ?
आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर असल्याचे आयकर विभागाने पुन्हा एकदा सांगितले आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर पसरत असलेल्या एका बनावट संदेशामुळे करदात्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु आयकर विभागाने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.
आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. आयकर विभागाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, करदात्यांनी अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्यावी. यामुळे करदात्यांना मनस्ताप होणार नाही.
15 सप्टेंबरपर्यंत ITR Filing न केल्यास काय होईल ?
ज्यांनी अद्याप त्यांचे ITR भरले नाहीत, त्यांच्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक आहेत. जर एखाद्या करदात्याने मुदतीमध्ये ITR भरला नाही, तर त्याला दंड आणि विलंब शुल्क भरावे लागेल. ज्यांचे उत्पन्न ₹5 लाख पेक्षा जास्त आहे त्यांना ₹5,000 चा दंड, तर कमी उत्पन्न असलेल्यांसाठी ₹1,000 चा दंड आकारला जाईल. तसेच, भरल्या गेलेल्या करावर दर महिन्याला 1% व्याजही लागेल. वेळेत ITR न भरल्यास करदात्यांना काही फायदेही गमवावे लागतात. म्हणूनच, वेळेवर रिटर्न भरणे महत्त्वाचे आहे. आयकर विभागाने रिटर्न दाखल करण्यास मदत करण्यासाठी 24×7 हेल्पडेस्क सेवाही उपलब्ध केली आहे, जेणेकरून करदात्यांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ITR भरल्यानंतर त्याचे 30 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. जर हे केले नाही, तर तुमचे रिटर्न ग्राह्य धरला जाणार नाही आणि परतावा मिळण्यासही अडचणी येतील.
नक्की वाचा: Pune School Holiday: पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर, 2025 पर्यंत 6 कोटी पेक्षा जास्त ITR दाखल करण्यात आले आहेत. मागील वर्षी 7.28 कोटी ITR दाखल झाले होते, ज्यामुळे करदात्यांमध्ये कर भरण्याची सवय वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, आता वेळ वाया न घालवता, आजच तुमचा ITR दाखल करा, नाहीतर उद्या पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.